Accident : आरवलीत मिनी बसची कारला धडक

आरवली : मुंबई-गोवा महामार्गावर आरवलीजवळ भरधाव वेगाने जाणाऱ्या मिनी बसने एका कारला धडक दिल्याने दोन महिलांसह दोन मुली जखमी झाल्या. या घटनेतील मिनी बसच्या चालकाने मद्यप्राशन केले होते. अपघात होताच चालक आणि त्याचा सहकारी जंगलात पळून गेले. अपघात रविवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास घडला. याचदरम्यान चिपळूण संगमेश्वरचे आमदार संगमेश्वरहून सावर्डेकडे जात होते. त्यांनी थांबून जखमींना रुग्णवाहिकेतून डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

याबाबत पोलिस आणि स्थानिक ग्रामस्थ यांनी दिलेल्या माहितीनुसार गुहागर येथील (एम. एच. ०४ एलवाय ६६७६) या क्रमांकाची आयशर मिनी बस रत्नागिरी येथे प्रवासी सोडण्यासाठी गेली होती. प्रवासी सोडून या बसवरील चालक रवी अरुण झाल्टे हा आपल्या ताब्यातील मिनी बस घेऊन भरधाव वेगाने चालला होता. आरवली ता. संगमेश्वर येथील पेट्रोल पंपाजवळ असलेल्या महामार्गावरील अवघड वळणावर चालकाचा बसवरील नियंत्रण सुटून ती दुभाजकाला आढळून पेट्रोल पंपजवळ असलेल्या पंक्चर काढणाऱ्याच्या दुकानात घुसली. याच वेळी तेथे पंक्चर काढण्यासाठी उभी असलेली मारुती व्हॅगनआर कार (क्र. एमएच ०२ बीजे १५१२ थांबली होती. मिनी बसने या कारला भीषण धडक दिली. यामध्ये कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच कारमध्ये बसलेले आबोली कल्पेश घडशी (वय ३२), रुद्रा रुपेश घडशी (२९), ऋग्वेद कल्पेश घडशी (५), कियारा रुपेश घडशी (३) हे जखमी झाले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
*शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:30 AM 01-Sep-2025