Mandangad : सजीव देखाव्यातून दिला मोबाईलमुक्तीचा संदेश

मंडणगड : तालुक्यातील पालघरवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने मोबाईलच्या अतिवापरावर प्रबोधन करणारा संदेश जिवंत देखाव्याद्वारे दिला आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करताना, टाकाऊ वस्तूंमधून शक्य तितक्या नैसर्गिक वस्तूंचा वापर करून ही सजावट करण्यात आली आहे.

बदलत्या परिस्थितीत लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांच्या जीवनाचा मोबाईल हा अविभाज्य भाग बनला आहे. सोशल मीडियावरील ‘रिल्स’ आणि मोबाईल गेम्समध्ये लोकांचा वेळ वाया जात आहे. त्यामुळे आरोग्यावरही परिणाम होत आहे.

मोबाईलच्या अतिवापराचा मानवी आरोग्याबरोबरच समाजजीवनावरही विपरीत परिणाम होत आहे. येथे सादर केलेल्या देखाव्यात खेळणारी, बागडणारी व उत्साहाने भरलेली मुले आता मोबाईलवर खेळताना दिसतात हे दर्शविण्यात आले आहे. घराशी आणि समाजाशी त्यांचे नाते तुटत चालले आहे, हे थांबवणे अत्यंत गरजेचे आहे. मोबाईलपासून कुटुंब सुरक्षित राहणे आवश्यक आहे. यासाठी पालघरवाडीतील बालगोपाळ गणेश मंडळाने लहान मुलांचे खेळांशी संबंधित प्रात्यक्षिक सादर केले आहे. त्यात पालघरवाडीतील बालकलाकार लगोरी, अबादुबी, गोट्या, विटू दांडू, आईचे पत्र हरविले, पकडा पकडी, आंधळी कोशिंबीर असे एकाहून एक पारंपरिक खेळ खेळताना दिसतात. या सादरीकरणानंतर समारोपावेळी ‘मोबाईलचा शक्य तितका कमी वापर करावा,’ असा ठळक संदेश दिला जातो.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
*शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:15 AM 01-Sep-2025