संगमेश्वर : संगमेश्वर तालुक्यातील शास्त्रीपूल ते गणेशकृपा हॉटेलपर्यंत एकेरी वाहतूक सुरू असल्याने पुन्हा वाहतूक कोंडी होत आहे.
मुंबईकडे जाताना गणेशकुया हटिल ते शास्त्रीपूलदरम्यान एकेरी वाहतुकीचा रस्ता असल्याने मानसकोंडपासून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. मानसकोंड व काहीवेळा स्वाद हॉटेलपासून शास्त्रीपुलापर्यंत पोहचण्यासाठी २.३० ते ३ तास लागत आहेत. मुंबई, पुणेस्थित कोकणवासियांना शहरात पोहचण्याची प्रत्येकालाच घाई असल्याने प्रत्येकजण पुढे पुढे जाण्याच्या नादात ही परिस्थिती निर्माण होत आहे. एकतर, रस्त्याला असंख्य खड्डे व एकेरी वाहतूक यामुळे वाहनचालक पुरते हैराण झाले आहेत.
संगमेश्वर येथील सुरू असलेल्या पुलाच्या कामामुळे ही वाहतूक कोंडी होण्यास कारण ठरत आहे. या पुलाचे काम कूर्मगतीने सुरू असल्याने या ठिकाणी वाहतूक व्यवस्थापनाचा बोजवारा उडाला आहे. पोलिसांची दमछाक झालेली पाहायला मिळत आहे. संगमेश्वर येथील पुलावरचे काम खरंतर अत्यंत जलदगतीने कालमर्यादेत होण्याची गरज होती; पण याकडे ना कंपनी गांभीर्याने घेते आहे ना प्रशासन.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:19 PM 05/Sep/2025












