राजापूर : गेले नऊ दिवस विविध धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा झालेल्या येथील शताब्दी महोत्सवी राजापूर सार्वजनिक गणेशोत्सवाची गुरूवारी विसर्जन मिरवणुकीने सांगता झाली.
राजापूर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे यंदा १०० वे वर्ष होते. या निमित्त उत्सव काळात भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. गुरूवारी परंपरेने शहरातील समर्थनगर येथील मारूती मंदिर धर्मशाळेतील या उत्सवात प्रतिष्ठापीत करण्यात आलेल्या श्रीं ची गुरूवारी ढोल ताशांच्या गजरात पारंपारिक पध्दतीने भव्य विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. तर सायंकाळी उशीरा गणेश विसर्जन घाटावर श्री मुर्तीचे विसर्जन करण्यात आले. या मिरवणुकीत विविध ढोलपथकांबरोबर सहभागी झालेल्या स्थानिक महिलांच्या दोन ढोलपथकांनी व पारंपारिक युध्दकला प्रात्यक्षिकांनी मिरवणुकीची रंगत वाढविली.
समर्थनगर येथील मारूती मंदिर धर्मशाळेतील उत्सव स्थळाहून दुपारी ढोलताशांच्या गजरात ही मिरवणुक काढण्यात आली. या विसर्जन मिरवणुकीत शहरातील महिला ढोलपथके, धोपेश्वर नाडणकरवाडी, कात्रादेवी ढोल पथक, नवजवान मित्रमंडळ सौंदळ ढोलपथक तसेच ह. भ. प. दादा राजापकर आणि वारकरी मंडळाच्या वारकरी दिंडी तसेच हर्डी येथील भजन मंडळाचा भजनमेळाची साथ लाभल्याने मिरवणुकीची रंगत वाढली. या दरम्यान ऐतिहासिक लाठ्याकाठ्या, दांडपट्टा व अन्य मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. प्रकाश चव्हाण, दिपक नाटेकर व सहकाऱ्यांनी सादर केलेल्या या आगळ्या वेगळया मर्दानी खेळाने मिरवणुकीत आणखीनच रंगत आणली. हे खेळ पाहण्यासाठी नागरीकांनी गर्दी केली होती.
उत्सव स्थळापासून राजापूर हायस्कुल, जवाहरचौक, बाजारपेठ मार्गे रवाना होत गणेशघाटावर सायंकाळी उशीरा मिरवणुकीची सांगता झाली. या उत्सवातील श्रींची परंपरेने पालखीतून मिरवणुक काढण्यात आली. गणपती बाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकर या अशी साद घालत गणरायाला निरोप देण्यात आला.
मिरवणुकी दरम्यान विसर्जन मार्गावर राजापूरातील गणेशभक्त युवक युवतीनी ठिकठिकाणी रांगोळ्या काढल्या होत्या. या मिरवणुकीत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सर्व पदाधिकारी तसेच गणेशभक्त नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. विसर्जन स्थळी पुढील वर्षीच्या मुर्तीदाता सोडत पध्दतीने निवडण्यात आला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:11 PM 05/Sep/2025












