संगमेश्वर : तालुक्यातील निवेखुर्द माईनवाडी येथील तरूण तडफदार संजय माईन यांनी घरगुती गणेशोत्सवात ‘जागरण गोंधळ’ देखावा अतिशय सुंदररित्या चलचित्र स्वरूपात साकारला आहे. हा देखावा लक्षवेधी ठरत असून तो पाहण्यासाठी गणेशभक्तांची सध्या रिघ लागल्याचे पहावयास मिळत आहे. संजय माईन हे दरवर्षी घरगुती गणेशोत्सवात एखादा विषय घेवून देखावा साकारत असतात. त्यांचा देखावा गणेशभक्तांच्या पसंतीस उतरत असतो. देखाव्याच्या माध्यमातून ते संदेश देत असतात.
जागरण गोंधळ ही महाराष्ट्रातील सांस्कृतिक व धार्मिक परंपरा आहे. ही एक पारंपरिक लोककला आणि धार्मिक विधी आहे, ज्यात रात्रभर जागून खंडोबा आणि कुलदेवतेची आराधना केली जाते. नवस पूर्ण झाल्यावर, लग्नप्रसंगी किंवा इतर शुभकार्यांसाठी गोंधळ घातला जातो, ज्यामध्ये गोंधळी गाणी गाऊन, कथा सांगून आणि नृत्य करून देवाला आमंत्रित करतात. हा विधी घरासमोरच्या अंगणात किंवा ओट्यावर केला जातो. हाच ‘जागरण गोंधळ’ संजय माईन यांनी आपल्या घरगुती गणेशोत्सवात चलचित्र स्वरूपात दाखवला आहे. संजय माईन यांना गणेशोत्सवात देखावा साकारण्याची आवड असून धार्मिक, पर्यावरण, प्रबोधनात्मक विषयांवर देखाव्याच्या माध्यमातून ते संदेश देत असतात.
आजपर्यंत त्यांनी घरगुती गणेशोत्सवात संतांचा महिमा, लाकूडतोड्याची कथा, केदारनाथ धाम, पंढरीची वारी, कोविड योध्दा, श्री. स्वामी समर्थ, मार्लेश्वर देवस्थान, निसर्ग देखावा, वृक्षलागवड, शेतकऱ्यांच्या आत्महत्या आदिंसह अन्य देखावे अतिशय कलात्मकरित्या साकारले आहेत. यातील कोरोना काळात त्यांनी साकारलेल्या ‘कोविड योध्दा’ या देखाव्याला रत्नागिरीतील मंगलमूर्ती प्रतिष्ठानकडून उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले होते. यावर्षी त्यांनी असाच एक नवीन विषय घेवून ‘जागरण गोंधळ’ हा चलचित्र देखावा उत्तम पध्दतीने साकारला आहे. हा देखावा त्यांनी अवघ्या १० दिवसात साकारला आहे. देखावा साकारण्यासाठी संजय माईन यांना संदेश माईन, रामकृष्ण माईन व प्रतिक माईन यांचे सहकार्य लाभले. या देखाव्यातून खरोखरच ‘जागरण गोंधळ’ पाहण्याचा भास होत असल्यामुळे हा देखावा पाहण्यासाठी गणेशभक्तांची रिघ लागत आहे. देखावा पाहिल्यावर गणेशभक्तांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव पहावयास मिळत आहेत. देखाव्याच्या माध्यमातून संजय माईन हे एकप्रकारे गणेशभक्तांना समाधान देत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:24 PM 05/Sep/2025












