रत्नागिरी : सार्वजनिक बांधकाम विभागाने राज्यमार्ग व प्रमुख जिल्हा मार्ग (रस्ते व पूल) योजनेअंतर्गत प्रलंबित देयकांसाठी उपलब्ध करून दिलेल्या निधीमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील ठेकेदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात जवळपास ३७५ कोटी रुपयांची देणी प्रलंबित असताना, शासनाकडून तातडीने ४३ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून, तो लवकरच ठेकेदारांना वितरित केला जाईल. त्यामुळे कंत्राटदारांचा रखडलेला गणेशोत्सव काही प्रमाणात गोड होण्यास मदत होणार आहे.
राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अवर सचिवांनी (उपसचिव) काढलेल्या एका महत्त्वपूर्ण आदेशानुसार, राज्यभरातील सार्वजनिक बांधकाम मंडळांना निधी वितरणासंदर्भात काही महत्वपूर्ण सूचना देण्यात आल्या आहेत. या सूचनांनुसार, कंत्राटदारांची प्रलंबित देणी टप्प्याटप्प्याने अदा केली जाणार आहेत, जेणेकरून मोठ्या संख्येने असलेल्या लहान देयकांचे वितरण सोपे होईल आणि कंत्राटदारांमधील असंतोष कमी होईल.
या आदेशानुसार, पहिल्या टप्प्यात सन २०२४-२५ किंवा त्यापूर्वीची ५० लाख पर्यंतची प्रलंबित देयके असलेल्या प्रत्येक कंत्राटदाराला रु. ५० लाख किंवा प्रत्यक्ष देयके यापैकी जी रक्कम कमी असेल, ती प्रथमतः अदा करण्यात येईल. यामध्ये मजूर सहकारी संघटना, सुशिक्षित बेरोजगार संघटना आणि खुले कंत्राटदार यांच्या देयकांचे प्रमाणशीर पद्धतीने वितरण केले जाईल. त्यानंतर ५० लाख ते १ कोटी रकमेची प्रलंबित देयके असलेल्या कंत्राटदारांना प्राधान्याने निधी दिला जाईल. या दोन्ही टप्प्यांनंतर उर्वरित निधीचे वाटप मंडळ कार्यालयाने निश्चित केलेल्या समान न्यायिक सूत्रानुसार केले जाईल.
रत्नागिरी जिल्ह्यात ठेकेदारांची ३७५ कोटी रुपयांची देणी थकलेली आहेत. यापैकी शासनाने ४३ कोटी रुपयांचा निधी जिल्ह्यासाठी उपलब्ध करून दिला आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग लवकरच या मार्गदर्शक सूचनांनुसार हा निधी कंत्राटदारांना वितरीत करणार आहे.
या निर्णयामुळे अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या कामांची देयके मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या निधीमुळे ठेकेदारांना आर्थिक पाठबळ मिळेल आणि गणेशोत्सवासारख्या सणासुदीच्या काळात त्यांना दिलासा मिळेल अशी अपेक्षा आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने दिलेल्या सूचनांनुसार, कोणताही वाद निर्माण होणार नाही याची पूर्ण काळजी घेण्यास नियंत्रण अधिकाऱ्यांना सांगण्यात आले आहे.
ना. शिवेंद्रराजेंचा पाहणी दौरा ठरला फलदायी
गणेशोत्सवापूर्वी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी केली होती. या दौऱ्यामध्ये ठेकेदारांनी त्यांना निवेदन दिले होते. राजापूरचे आमदार किरण तथा भैय्या सामंत यांनीही ना. भोसले यांच्यासमोर छोट्या ठेकेदारांच्या व्यथा सांगितल्या होत्या. राज्य शासनाने निधी प्राप्त करुन दिल्यामुळे छोट्या ठेकेदारांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
*शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:09 AM 06-Sep-2025












