चिपळूण : तालुक्यातील रामपूर व चिवेली ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा योजनेतील कथीत गैरव्यवहार प्रकरणी अंतीम अहवाल देण्यास जिल्हा परिषदेला वेळ लागला आहे. या प्रकरणी दिरंगाईस कारणीभूत असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करून ८ सप्टेंबरपर्यंत अंतीम कार्यवाहीचा अहवाल देण्याचे आदेश कोकण विभागीय आयुक्तांनी जि.प.ला दिले आहेत.
या संदर्भात तालुक्यातील रामपूर तळ्याचीवाडी येथील पाणी योजनेसंदर्भात रमेश चव्हाण यांनी तर चिवेली येथील राष्ट्रीय पेयजल योजनेबाबत विद्याधर साळुंखे यांनी कोकण आयुक्तांकडे तक्रार केली होती. या दोन्ही योजनेतील गैरव्यवहार प्रकरणी संबंधित तक्रारदार जि. प. तसेच विभागीय आयुक्तांपर्यंत पाठपुरावा करीत आहेत. गेल्या काही वर्षांपासून या योजनांची चौकशी सुरू आहे; मात्र या बाबत कोणतीही कारवाई झालेली नाही. हे प्रकरण विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या अध्यक्षांकडे गेले होते. त्यावर अध्यक्षांनी ३० दिवसांत अंतीम अहवाल देण्याच्या सूचना १० जून २०२५ रोजी केली होती. त्यानंतर देखील अंतीम अहवाल पाठविण्यात आलेला नाही.
या प्रकरणी जि. प.चे अधिकारी गांभीयनि दखल घेत नाहीत व कागदापत्रासंदर्भात चालढकल करीत असल्याचे विभागीय आयुक्तांनी म्हटले आहे. त्यामुळे दिरंगाईस जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करण्याबाबत तातडीने प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे पाठवावा. तसेच या प्रकरणातील अंतीम प्रस्ताव कार्यवाहीसाठी ८ सप्टेंबरपर्यंत द्यावा असा आदेश विभागीय आयुक्तांनी जि. प. च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिला आहे. त्यामुळे या प्रकरणात दोषी ठेकेदार, तत्कालीन पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांवर कारवाई होणार आहे; मात्र त्याआधी या प्रकरणी अहवाल देण्यास उशिर करणारे अधिकारी आता अडचणीत आल्याचे स्पष्ट होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
*शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:24 AM 06-Sep-2025












