Chiplun Nagar Parishad : प्रभाग रचना हरकतींवर काही दिवसांत निर्णय

चिपळूण : चिपळूण नगर परिषद निवडणूक नियोजन कार्यक्रमांतर्गत बदललेल्या प्रभाग रचनेसंदर्भात नागरिकांकडून आलेल्या हरकती व सूचनांसंदर्भात गुरुवारी (दि. ४) सुनावणी घेण्यात आली. सुनावणी दरम्यान हरकतदारांचे म्हणणे ऐकुन घेण्यात आले. आता या संदर्भात पुढील निर्णय येत्या काही दिवसात स्पष्ट केला जाणार आहे.

आगामी सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून आलेल्या कार्यक्रमांतर्गत चिपळूण नगर परिषदेने शहरातील प्रभाग रचनेत काहीअंशी बदल केला आहे. दरम्यान, दोन नगरसेवकांसह एक प्रभागाची वाढ झाल्याने पूर्वीच्या प्रभाग रचनेत फेरबदल करण्यात आले. २०११ ची जनगणना ग्राह्य धरून १ प्रभाग वाढला असून २ नगरसेवकांच्या संख्येत वाढ झाली आहे.

बदललेल्या प्रभाग रचनेसंदर्भात ३० ऑगस्टपर्यंत नागरिकांना हरकतींसाठी मुदत देण्यात आली होती.त्यानुसार निर्धारीत वेळेत सुमारे १९ हरकती प्राप्त झाल्या. सर्वात जास्त हरकती प्रभाग क्र. ५, ७, ८ व ११ येथून प्राप्त झाल्या. त्या संदर्भात गुरुवारी इंदिरा गांधी सांस्कृतीक केंद्रात निवडणूक अधिकारी तथा प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत सुनावणी झाली.

यावेळी मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्यासह प्रभाग रचना समितीचे सदस्य उपस्थित होते. तक्रारदारांकडून प्रभाग बदलांसंदर्भात काही हरकती व सूचनांचे मुद्दे उपस्थित करण्यात आले. प्रामुख्याने वास्तव्य एका प्रभागात तर मतदान दुसऱ्या प्रभागात अशा स्वरूपाच्या हरकतींसह पूर्वीची प्रभाग रचना बदल करताना पूर्वीच्या प्रभागातील जवळचा भाग वगळून दुसऱ्या प्रभागातील लांबचा भाग जोडला असल्याच्या हरकती व सूचना यावेळी निदर्शनास आणण्यात आल्या.

या सर्व सुनावणीअंती याबाबत तांत्रिक पडताळणी करून योग्य तो निर्णय जाहीर केला जाणार असल्याचे सांगण्यात आले. या हरकती घेणाऱ्यांमध्ये दोन माजी नगरसेवकांसह संबंधित प्रभागातील काही नागरिक, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये लियाकत शाह, मिलिंद कापडी, विजय चितळे, शशिकांत मोदी, आशिष खातू, निहार कोवळे, राम शिंदे, राकेश दाते, नानू आवटी आदींचा समावेश होता.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
*शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:40 AM 06-Sep-2025