Dapoli : घंटागाडी बंद होताच बुरोंडीत कचऱ्याचा प्रश्न एरणीवर

दापोली : तालुक्यातील बुरोंडी ग्रामपंचायत परिसरात सध्या कचऱ्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. ग्रामपंचायतीकडून कचरा गोळा करून त्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी काही काळापूर्वी घंटागाडी उपलब्ध करून देण्यात आली होती. त्यामुळे उघड्यावर कचरा टाकणे थांबले होते. मात्र, काही कारणास्तव गेल्या काही दिवसांपासून ही घंटागाडी बंद पडल्याने पुन्हा गावात कचऱ्याचा सडा पडू लागला आहे.

ऐन सणासुदीच्या दिवसात घंटागाडी बंद झाल्याने ग्रामस्थांना कचरा टाकण्यासाठी योग्य व्यवस्था उपलब्ध नाही. त्यामुळे ग्रामस्थ पुन्हा रस्त्यावर व समुद्रकिनारी कचरा टाकू लागले आहेत. त्यामुळे कचऱ्याचे साम्राज्य पसरले असून, गावात ठिकठिकाणी दुर्गंधी पसरली आहे.

विशेषतः प्लास्टिकचा कचरा, माशांच्या अवशेषांचा व इतर सडणाऱ्या वस्तूंचा साठा झाल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. कचऱ्यामुळे डेंग्यू, मलेरिया, गॅस्ट्रो यांसारख्या आजारांचा प्रादुर्भाव होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीकडे तातडीने घंटागाडी पुन्हा सुरू करून गावातील कचरा गोळा करण्याची मागणी केली आहे. तसेच कचरा संकलनाचे नियमित वेळापत्रक तयार करून गावात स्वच्छता राखावी, अशी मागणी केली आहे. कचऱ्याच्या प्रश्नावर वेळीच तोडगा न काढल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
*शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
3:08 PM 06-Sep-2025