चिपळूण : रायगड जिल्ह्यातील महाड येथील एका महिलेच्या गर्भाशयातील फायब्रॉइड गाठ शस्त्रक्रिया करून काढण्यात डेरवण (ता. चिपळूण) येथील वालावलकर रुग्णालयातील डॉक्टरांना यश आले. दीड तास चाललेल्या शस्त्रक्रियेनंतर तीन किलोची ही गाठ बाहेर काढण्यात आली.
गेल्या वर्षभरापासून या महिला मासिक पाळीचा त्रास, पोटदुखीमुळे ग्रस्त होत्या. शिवाय शरीरातील रक्तही फार कमी होऊन वजन घटले होते. नातेवाइकांच्या सल्ल्याने त्यांनी मुंबई येथे तपासणी करून घेतली. तिथे गर्भाशय किंवा अंडाशयाच्या कर्करोगाची शक्यता व्यक्त करत एमआरआय चाचणी करण्याचा सल्ला देण्यात आला. त्यासाठी मुंबईतील एका रुग्णालयात त्यांना पाठविण्यात आले. मात्र, अपॉइंटमेंटसाठी लागणारा कालावधी लक्षात घेऊन त्यांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी डेरवण येथील वालावलकर रुग्णालय गाठले.
वालावलकर रुग्णालयात दाखल झाल्यानंतर एमआरआय तपासणी करण्यात आली. त्यात ही गाठ गर्भाशयातील फायब्रॉइड (गाठ) असल्याचे निष्पन्न झाले. मात्र, हिमोग्लोबिन फक्त सहा ग्रॅम असल्याने तीन बाटल्या रक्त देऊन आधी तब्येत सुधारण्यासाठी प्रयत्न करण्यात आले.
त्यानंतर शस्त्रक्रियेचा निर्णय घेण्यात आला आणि संपूर्ण गर्भाशय, दोन्ही अंडाशय आणि नलिका काढण्यात आल्या. ही शस्त्रक्रिया स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. रक्षा शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली डॉ. वैष्णवी गोरे आणि डॉ. निहारिका राऊळ यांच्या साहाय्याने पार पडली.
फायब्रॉइड हा दर पाच स्त्रियांमागे एकीला होणार आजार आहे. ही गाठ गर्भाशयातील स्नायूंची असते. यामध्ये कॅन्सर असण्याची शक्यता फार कमी असून, प्रजननक्षम वयातील स्त्रियांमध्ये दिसते. त्यामुळे घाबरून ना जाता त्वरित स्त्रीरोगतज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. – डॉ. सुवर्णा पाटील, संचालिक, वालावलकर रुग्णालय
महिलेच्या तब्येतीत सुधारणा
पोटातून आठ महिन्यांच्या गर्भासारखी दिसणारी तब्बल ३.७७५ किलोची ३० बाय ३० सेंटिमीटर मोठी गाठ काढण्यात डॉक्टरना यश आले. आता महिलेची तब्येत सुधारत असून, पोटदुखी आणि मासिक पाळीचा त्रास पूर्णपणे थांबला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
*शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
3:39 PM 06-Sep-2025












