khed : दुचाकीस्वाराची रस्त्यात पडलेली बॅग मिळाली; जीवन आंब्रे यांचा प्रामाणिकपणा

आवाशी : पोलादपूर ते राजापूर प्रवासादरम्यान दुचाकीस्वाराची आवाशी खेड येथे हरविलेली, महत्वाची कागदपत्रे व रोख रकमेची बॅग खेडचे माजी सभापती जीवन आंब्रे यांनी परत करून प्रामाणिकपणाचे घडवले.

पोलादपूर निवे येथील शैलेश संजय चिकणे व राजापूर येथील त्याचा मित्र राजेश कदम शुक्रवारी २९ ऑगस्ट रोजी ‘ पोलादपूर ते राजापूर असा दुचाकीवरून प्रवास करत होते. यावेळी खेड तालुक्यातील आवाशी गावाच्या हद्दीत दुचाकीला बांधलेली त्याची बॅग दुचाकीवरून खाली पडली. वाऱ्याचा वेग असल्याने ते त्यांच्या लक्षात आले नाही. याचवेळी काही वेळाने खेडचे माजी सभापती जीवन गोविंद आंब्रे हे त्याच मार्गावरुन प्रवास करताना कुणाची तरी बॅग पडली आहे हे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी त्यांच्या चारचाकीतून उतरून ती बॅग आपल्या ताब्यात घेतली व ही गोष्ट आवाशीचे माजी शाखाप्रमुख रुपेश आंब्रे यांना कळविली.

रुपेश व जीवन यांनी बॅग तपासली असता त्यात शैलेश याची काही महत्त्वाची कागदपत्रे व रोख रक्कम आढळली. लागलीच त्यांनी ही माहिती त्या तरुणाला फेसबुक व इंस्टाग्रामवर दिली. त्यानुसार मंगळवार २ सप्टेंबरच्या रात्री तो तरुण आवाशी येथे आला व त्याने आपली बॅग ताब्यात घेतली. सर्व कागदपत्रे व पाकिटातील रोख रक्कम तपासून घेतली. यावेळी त्याला खूप आनंद झाला. त्याने आवाशीतील या तरुणांचे मनापासून आभार मानले. यावेळी जीवन आंब्रे, रुपेश आंब्रे, आवाशीचे माजी सरपंच अमित आंब्रे, अजित आंब्रे, तुषार आंब्रे, प्रशांत फावरे उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
*शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
4:36 PM 06-Sep-2025