Lanja : दुचाकीच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या वृद्धाचा मृत्यू

लांजा : रस्त्याने चालणाऱ्या एका वयोवृद्धाला दुचाकीने दिलेल्या जोरदार धडकेत गंभीर जखमी झालेल्या वृद्धाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी ५ सप्टेंबर रोजी घडली. या अपघाताप्रकरणी दुचाकी चालकाविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सदानंद कृष्णा कांबळे (वय. ७५, रा. हसोळ, ता. लांजा) असे आघातात मृत्यू झालेल्या वयोवृध्दाचे नाव आहे. कांबळे हे आपल्या कौटुंबिक कामानिमित्त लांजा येथे आले होते. रस्त्याच्या एका बाजूने चालत असताना या दरम्यान रवींद्र शरद शिंदे (वय ३८, रा. वेरळ, ता. लांजा) हा आपल्या ताब्यातील बजाज डिस्कव्हर मोटारसायकल (एम एच ०८, यु ७९७६) घेऊन लांजा ते राजापूरच्या दिशेने निघाला होता. भरधाव चालणाऱ्या रवींद्र शिंदे याने रस्त्याच्या बाजूने चालणाऱ्या सदानंद कांबळे यांना पाठीमागुन जोरदार धडक दिली. हा अपघात मुंबई-गोवा महामार्गावर काळे छात्रालय समोर घडला. धडक बसताच कांबळे रस्त्यावर जोरदार आदळले.

यामध्ये त्यांच्या हाताला व डोक्याला जबर इजा झाली, तर दुचाकी चालक शिंदे जखमी झाला. गंभीर जखमी झालेल्या सदानंद कांबळे यांना लांजा ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. या अपघात प्रकरणी भरधावपणे मोटारसायकल चालवाणाऱ्या रवींद्र शिंदे याच्यावर लांजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:01 AM 08/Sep/2025