Ratnagiri : चांदेराई-तेलीवाडीत किरकोळ कारणातून चार जणांना जबर मारहाण

रत्नागिरी : तालुक्यातील चांदेराई-तेलीवाडी येथे किरकोळ कारणातून एकाच कुटुंबातील चार जणांना जबर मारहाण करण्यात आली. ही घटना शनिवार 6 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वा. सुमारास घडली असून याप्रकरणी तिन जणांविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

समिर सुरेश आंब्रे (45), अमित सुरेश आंब्रे (42) आणि एक महिला (सर्व रा. चांदेराई-तेलीवाडी, रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तीन संशयितांची नावे आहेत. त्यांच्या विरोधात विनोद प्रमोद आंब्रे (50, रा. चांदेराई-तेलीवाडी, रत्नागिरी) यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, शनिवार 6 सप्टेंबर रोजी ते चांदेराई बाजारातून घरी जात होते. त्यावेळी वाडित जाणाऱ्या रस्त्यामध्ये समिर आंब्रेने रिक्षा आडवी करुन ठेवल्याने ती बाजुला करण्यासाठी फिर्यादीने हॉर्न वाजवला. तेव्हा संशयित समिर आंब्रे आणि विनोद आंब्रे यांच्यात बाचाबाची झाली. त्यांचा आवाज ऐकून फिर्यादीच्या आईने अंगणात येउन काही झाले अशी विचारणा केली.

तेव्हा संशयित समिरने फिर्यादीच्या आईला पूर्वीच्या जमिनीच्या वादातून शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरुवात केली. फिर्यादी आपल्या आईला सोडवण्यासाठी गेला असता संशयित अमित आंब्रेने आपल्या हातातील लाकडी दांडक्याने फिर्यादीच्या चेहऱ्यावर मारहाण केली. त्यामुळे फिर्यादी हे खाली उताणे पडल्याने त्यांच्या डोक्याला पाठीमागे मार लागला. दरम्यान, फिर्यादीची पत्नी व मुलगी यांना देखील संशयितांनी शिवीगाळ व हातांच्या थापटांनी मारहाण करुन ठार मारण्याची धमकी दिली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:52 PM 08/Sep/2025