Dapoli : हर्णै समुद्रकिनारी मृतावस्थेत आढळला डॉल्फिन

दापोली : तालुक्यातील हर्णै समुद्रकिनारी रविवारी सकाळी एक डॉल्फिन मृतावस्थेत सापडला. गंभीर जखमी अवस्थेतील डॉल्फिनला वाचविण्यासाठी मच्छीमारांनी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, गंभीर दुखापतीमुळे हे प्रयत्न निष्फळ ठरले.

हर्णेतील स्थानिक मच्छीमारांना समुद्रकिनारी रविवारी सकाळी मृतावस्थेत डॉल्फिन दिसला. हा डॉल्फिन गंभीर जखमी झाल्याचे लक्षात येताच त्याला वाचविण्यासाठी मच्छीमारांनी प्रयत्न केले. मात्र, त्याला वाचविता आले नाही. या घटनेची माहिती परिसरात पसरताच डॉल्फिन पाहण्यासाठी समुद्रकिनाऱ्यावर लोकांनी गर्दी केली होती. हर्णे समुद्रकिनाऱ्यावर यापूर्वीही डॉल्फिन मृतावस्थेत सापडल्याच्या घटना घडल्या आहेत. वारंवार अशा घटना घडत असल्याने समुद्री जीवांचे संरक्षण आणि सुरक्षिततेसाठी उपाययोजना करण्याची मागणी मच्छीमारांनी केली आहे.

मच्छीमारांच्या मते, खोल समुद्रातील मासेमारी, बोटींची वाढती संख्या, तसेच काही ठिकाणी टाकल्या जाणाऱ्या जाळ्यांमुळे समुद्री जीवांना धोका निर्माण होत आहे.

नमुने प्रयोगशाळेत पाठविणार
या घटनेची माहिती मिळताच मत्स्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होत पाहणी केली. डॉल्फिनच्या मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी काही नमुने गोळा करण्यात आले आहेत. हे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात येणार असल्याचे मत्स्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:00 PM 08/Sep/2025