रत्नागिरी: राजापूर तालुक्यातील आणि आसपासच्या परिसरातील नागरिकांसाठी अत्यंत आनंदाची आणि महत्त्वपूर्ण बातमी समोर आली आहे. अनेक वर्षांपासूनची मागणी असलेली लोकमान्य टिळक टर्मिनस-तिरुवनंतपुरम सेंट्रल नेत्रावती एक्सप्रेस (ट्रेन क्र. १६३४५/१६३४६) अखेर राजापूर रोड रेल्वे स्टेशनवर थांबणार आहे. या थांब्याला रेल्वे मंत्रालयाने अधिकृत मंजुरी दिली असून, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश आले आहे.
केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्वतः एका पत्राद्वारे देवेंद्र फडणवीस यांना ही मंजुरी दिल्याची माहिती कळवली आहे, ज्यामुळे कोकणवासियांमध्ये, विशेषतः राजापूर तालुक्यात आनंदाचे वातावरण पसरले आहे. केंद्रीय रेल्वे, माहिती आणि प्रसारण मंत्री, श्री. अश्विनी वैष्णव यांनी २ ऑगस्ट २०२५ रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून या निर्णयाची माहिती दिली. या पत्रानुसार, राजापूर रोड रेल्वे स्टेशनवर नेत्रावती एक्सप्रेसला थांबा देण्याची मागणी स्वीकृत करण्यात आली आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २१ मे २०२५ रोजी रेल्वे मंत्रालयाकडे नेत्रावती एक्सप्रेसला राजापूर रोड येथे थांबा मिळावा, अशी मागणी केली होती. त्यांच्या या मागणीची आणि पाठपुराव्याची दखल घेत रेल्वे मंत्रालयाने अवघ्या दोन महिन्यांत सकारात्मक निर्णय दिला आहे. राजापूर तालुक्यातील अनेक नागरिक नोकरी, शिक्षण आणि व्यवसायानिमित्त मुंबई, ठाणे तसेच दक्षिणेकडील राज्यांमध्ये प्रवास करतात. नेत्रावती एक्सप्रेस ही मुंबई आणि तिरुवनंतपुरम या दोन महत्त्वाच्या शहरांना जोडणारी एक अत्यंत सोयीची गाडी आहे. या गाडीला राजापूर रोड येथे थांबा मिळाल्यामुळे प्रवाशांची मोठी सोय होणार असून, त्यांचा वेळ आणि पैसा या दोन्हींची बचत होईल. अनेक वर्षांपासूनची ही मागणी पूर्ण झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:11 09-09-2025












