चिपळूण : शहरातील मुंबई-गोवा महामार्गालगत अतिक्रमणे वाढली आहेत. अनेक ठिकाणी महामार्गाच्या दुतर्फा बांधलेल्या गटारावर टपऱ्या उभ्या करण्यात आल्या आहेत. याकडे राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाने पूर्णतः डोळेझाक केली असून, नगर परिषदेचे देखील अशा अनधिकृत व्यावसायिकांना अभय आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे.
चिपळूण शहरात चौपदरीकरण अंतर्गत बहादूरशेख चौक ते प्रांत कार्यालयापर्यंत उड्डाण पुलाचे काम सुरू आहे. उड्डाण पुलाच्या दोन्ही बाजूला कॉक्रिटचा सर्व्हिस रोड बांधण्यात आला आहे. या रोडलगतच्या गटारावर दिवसेंदिवस अनेक टपऱ्या उभ्या राहात आहेत. यातील काही टपऱ्या तर कायमच बंद स्थितीत दिसत आहेत; मात्र काही लोकांनी अनधिकृतपणे या जागा अडकविण्यासाठी त्या ठिकाणी टपऱ्यांची उभारणी केली आहे. शहरातील बहादूरशेख चौक ते कापसाळ विश्रामगृह दरम्यान सर्व्हिस रोडलगतच्या गटारांवर अशा टपऱ्या वाढल्या आहेत. याकडे राष्ट्रीय महामार्ग विभागाने पूर्णतः दुर्लक्ष केले आहे. मध्यंतरी या संदर्भात तक्रार झाल्यानंतर महामार्गालगतचे अतिक्रमण काढण्याची कारवाई करण्यात येणार होती; मात्र त्यानंतर शहरातील काही ठिकाणी महामार्गालगतची अतिक्रमणे काढण्यात आली.
तरीही गटारावर ठिकठिकाणी अंतरा अंतराने अनेक टपऱ्या उभ्या राहाताना दिसत आहेत. याकडे राष्ट्रीय महामार्ग विभागाने तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे. या अनधिकृत टपऱ्या उभारण्यास जबाबदार कोण? किंवा कोणाच्या आदेशाने व सहकार्याने या टपऱ्या उभ्या राहात आहेत याचा शोध घेऊन संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे. काही ठिकाणी या टपऱ्यांवर बंदी असलेला गुटखा तसेच जुगार मटका देखील चालविला जात आहे तर काही टपऱ्या गांजा, चरससाठी वापरल्या जात असल्याचा संशय काही नागरिकांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे पोलिसांनीही या टपऱ्यांची गंभीर दखल घेणे जरूरीचे आहे.
अपघाताची शक्यता…
गेल्या वर्षी महामार्गालगतच्या अशाच एका बंद टपरीमध्ये पावसापासून बचाव करण्यासाठी आडोशाला उभे राहाण्यास गेलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा लगतची संरक्षक भिंत कोसळून मृत्यू झाला होता. दुर्दैव म्हणजे त्याचा मृतदेह मिळण्यास देखील एक दिवस उजाडला. या दुर्घटनेनंतरही राष्ट्रीय महामार्ग विभाग जागा झालेला नाही. त्यानं तर देखील गेल्या वर्षभरात महामार्गाच्या सव्हीस रोडलगत असणाऱ्या गटारावरच अशा टपन्या उभ्या राहिल्या असून राष्ट्रीय महामार्ग विभागाने अनेकवेळा तक्रार करूनही त्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे अपघाताचीही शक्यता आहे.













