रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात मागील तीन महिन्यांत सततच्या पावसामुळे पालेभाज्यांच्या दरावर परिणाम झाले असून पालेभाज्यांचे दर वाढतच आहेत. गणेशोत्सवात ही पालेभाज्या, फळांचे दर वाढले होते. आता गणेशोत्सवानंतर ही रत्नागिरी जिल्ह्यात टोमॅटो वगळता मिरची, भेंडी, गवार, फरसबीचे दर शंभरीपार झाले आहेत. त्यामुळे महिलांच्या किचनमधील आर्थिक गणित कोलमडले आहे.
सणवारचा महिना सुरू झाल्यामुळे जीवनावश्यक वस्तूंपैकी पालेभाज्या दिवसेंदिवस महाग होत आहेत. श्रावण महिना नंतर गणेशोत्सव, गौराई सणात पालेभाज्या, फळांनी मोठी मागणी असल्यामुळे दर वाढले होते.
जिल्ह्यात सर्वदूर पाऊस होत असल्यामुळे कोल्हापूरसह अन्य जिल्ह्यातून भाजीपाला रत्नागिरी येत असतो. पालेभाज्या खराब होईल म्हणून भाजी विक्रेता दिवसभर चढ्यादराने भाजी विक्री करीत आहेत. त्यामुळे नागरिकांना नाईलाजास्तव भाजीपाला खरेदी करावा लागत आहे.
दोडके, पडवळ, दुधी भोपळ्याला मागणी असून दरही वाढलेलेच आहेत. पालेभाज्या ३० रूपये, टोमॅटो कधी ४० ते कधी ६० रूपये, कांदा-बटाटे ३० ते ४० रूपये किलो, मेथी ३० ते ४०, पालक २० ते ३० रूपयाला पेंढी मिळत आहे.
सफरचंद २०० रूपये किलो, संत्री १६० ते २००, पेरू १०० रूपये दीड किलो, डाळिंब १०० रूपये किलो, मका १०० रुपयांस तीन अशी विक्री होत आहे. पालेभाज्यांचे दर वाढतच असल्यामुळे आता नागरिक मूग, मसूर, हरभरा, चणाडाळ, कडवा, पावट, चवळी यासह विविध धान्य खरेदी करून भाज्या बनवत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:49 PM 09/Sep/2025













