रत्नागिरी : शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य नगर पालिका व महानगरपालिका शिक्षक संघटनेचे राज्यस्तरीय आदर्श शाळा, प्रेरणादायी आदर्श शाळा, आदर्श शिक्षक, सक्षम महिला आदर्श पुरस्कार जाहीर केले असून यांचे वितरण येत्या २७ सप्टेंबरला सातारा येथे होणाऱ्या भव्य कार्यक्रमात केले जाणार आहे. यावर्षी जाहीर झालेल्या पुरस्कारांमध्ये नुकतेच रत्नागिरी जिल्ह्याची पर्यटन शाळा म्हणून घोषित झालेल्या व जिल्ह्यातील सर्वात मोठ्या पटाची सरकारी शाळा म्हणून नावारूपास आलेल्या दामले विद्यालय अर्थात नगर परिषद शाळा क्रमांक १५ ची प्रेरणादायी आदर्श शाळा पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
दामले विद्यालय गेली अनेक वर्षे आनंददायी गुणवत्ता पूर्ण शिक्षणासाठी राबवत असलेले विविध अंगी उपक्रम, सातत्याने वाढत जाणारा पट, स्पर्धा परीक्षांचा ध्यास, शाळा विकासासाठी शाळा व्यवस्थापन समितीच्या सहकार्याने सुरू असलेला नियोजनबद्ध प्रवास यामुळे ही निवड झाली असल्याचे मुख्याध्यापक भगवान मोटे म्हणाले. हा पुरस्कार म्हणजे सर्व शिक्षक, पालक व विद्यार्थी यांच्या एकत्रित प्रयत्नांचे यश आहे, असेही ते म्हणाले. याच विद्यालयातील क्रियाशील शिक्षिका व गेल्या अनेक वर्ष स्कॉलरशिप व स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन करणाऱ्या तसेच दामले विद्यालय या प्राथमिक शाळेचे दहावीपर्यंतचे वर्ग सुरू व्हावेत, यासाठी सातत्याने प्रयत्नशील असणाऱ्या शिक्षिका श्रद्धा गांगण यांना आदर्श सक्षम महिला पुरस्कारही जाहीर झाला आहे.
एकाच वर्षी हे दोन्ही पुरस्कार शाळेला प्राप्त झाल्याबद्दल रत्नागिरी नगर परिषद शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी सुधाकर मुरकुटे; शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मिलिंद संसारे व सर्व कार्यकारिणीने सर्वांचे अभिनंदन केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:11 AM 10/Sep/2025













