chiplun : गोविंदराव निकम विद्यालयाने साक्षरता दिनानिमित्त काढली प्रभातफेरी

सावर्डे : सह्याद्री शिक्षणसंस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात विविध उपक्रमांच्या माध्यमातून साक्षरता दिनानिमित्त प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले. शिक्षण जीवन घडवते, आपल्या हक्क व कर्तव्यांची जाणीव करून देते आणि देशाच्या प्रगतीसाठी प्रत्येक नागरिक सुशिक्षित होणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र वारे यांनी जागतिक साक्षरता दिनानिमित्त केले.

विद्यार्थी मनोगतात ओवी पाकळे, अवनीश काकडे, वसुंधरा पाटील व आरूष जाधव यांनी साक्षरतेचे महत्त्व प्रभावीपणे मांडले. शिक्षक मंगेश दाते यांनी साक्षरतादिनाची पार्श्वभूमी व गरज स्पष्ट केली तसेच विद्यार्थ्यांना शंभर टक्के साक्षर भारत घडवण्याचे आवाहन केले. ज्येष्ठ शिक्षिका शिल्पा राजेशिर्के यांनी विद्यार्थ्यांना आपल्या परिसरातील निरक्षरांना मदत करण्याची सूचना केली. याप्रसंगी तयार केलेल्या भित्तिपत्रिकेचे उद्घाटन ज्येष्ठ शिक्षक अशोक शितोळे यांच्या हस्ते करण्यात आले. साक्षरतेबाबत जनजागृतीसाठी प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:25 AM 10/Sep/2025