Medical Store : जिल्ह्यातील पाच मेडिकल दुकानांचे परवाने निलंबित

रत्नागिरी : अन्न व औषध प्रशासनाने गेल्या चार महिन्यात जिल्ह्यातील सुमारे २५ मेडिकलच्या केलेल्या तपासणीत पाच मेडिकलचे परवाने निलंबित केले तर २ मेडिकलचे परवाने रद्द केल्याची कारवाई केली. डाटा अद्ययावत नसेल, बिल न ठेवणे, फार्मासिस्ट नसणे आदी कारणांमुळे ही कारवाई करण्यात आल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाचे कार्यालय प्रमुख आणि औषध निरीक्षक शशिकांत यादव यांनी दिली.

औषधविक्रीसह साठवणुकीसंबंधी नियमांचे पालन न केल्यामुळे कारवाई करण्यात आली आहे. तपासणी दरम्यान काही मेडिकल दुकानांमध्ये डाटा अद्ययावत नसणे, विक्री केलेल्या औषधांची बिले न ठेवणे आणि महत्त्वाचे म्हणजे औषधविक्री करताना आवश्यक असलेला फार्मासिस्ट उपलब्ध नसणे, अशा त्रुटी आढळून आल्या.

ग्राहकांच्या आरोग्याशी थेट संबंधित असलेल्या या व्यवसायात नियमांचे पालन करणे अत्यावश्यक आहे; मात्र काही दुकानदार या नियमांकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून आले, वरिष्ठांकडून आलेल्या यादीनुसार एप्रिल २०२५ पासून आतापर्यंत जिल्ह्यातील २५ मेडिकल दुकानांना अचानक भेटी देऊन तपासणी करण्यात आली. निरीक्षकांनी अचानक केलेल्या तपासणीमुळे नियम तोडणाऱ्या दुकानदारांमध्ये खळबळ उडाली. भविष्यातही कारवाई सुरू राहील औषधविक्रेत्यांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:46 AM 10/Sep/2025