संगमेश्वर : संगमेश्वर तालुक्यातील कडवई वाणीवाडी, बाजारपेठ, समर्थनगर येथील स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ता नसल्याने अंत्यसंस्कारासाठी जाताना ग्रामस्थांची गैरसोय होते. याबाबत वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची आमदार शेखर निकम यांनी दखल घेतली असून, रस्ता व साकवाचे अंदाजपत्रक तयार करण्याचे आदेश जिल्हा परिषद बांधकाम विभागाला दिले आहेत. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांबरोबर बैठक घेत संबंधित जागेची पाहणीही केली.
कडवई वाणीवाडी, बाजारपेठ व समर्थनगर येथील ग्रामस्थांना अंत्यविधीसाठी असलेल्या स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ता नाही. त्यामुळे गेली साठ वर्षे येथील ग्रामस्थांची फार मोठी गैरसोय होत आहे. पावसाळ्यामध्ये नदीच्या पाण्यातून शव नेताना ग्रामस्थांना मोठी कसरत करावी लागत आहे. याची दखल घेत आमदार निकम यांनी उपसरपंच दत्ताराम ओक्टे यांना संबंधित ग्रामस्थांबरोबर तत्काळ बैठक आयोजित करण्यास सांगितले.
त्याप्रमाणे दोन दिवसांपूर्वी कडवई हनुमानमंदिर येथे आमदार निकम यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. त्या वेळी आमदार निकम यांनी ही समस्या तत्काळ सोडवण्याचे आश्वासन उपस्थित ग्रामस्थांना दिले तसेच या कामाची पाहणी करून अंदाजपत्रक सादर करण्याचे आश्वासन आमदार निकम यांनी जिल्हा परिषद बांधकाम विभागाला दिले. त्यानुसार आज जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे अभियंता ओंकार कुंभार व देशपांडे यांच्या उपस्थितीत या जागेची पहाणी केली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:56 AM 10/Sep/2025













