Ratnagiri: आत्महत्येसारख्या गंभीर समस्येला तोंड देण्यासाठी रत्नागिरी प्रादेशिक मनोरुग्णालयाचे साहाय्य घेण्याचे आवाहन

बुधवार, १० सप्टेंबर हा दिवस ‘जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस’ म्हणून गणला गेला आहे. या निमित्ताने रत्नागिरी प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या अधीक्षक डॉ. संघिमित्रा फुले यांनी याविषयी दिलेली माहिती येथे दिली आहे.

आत्महत्या याचाच अर्थ स्वतःचा जीव घेणे. आत्महत्येची कृती करण्यामागे आत्महत्येचे विचार येणे म्हणजेच स्वतःचा जीव घेण्याचा विचार येणे. सध्या प्रतिदिन प्रसार माध्यमांद्वारे अशा घटना वाचायला किंवा ऐकायला मिळतात. जागतिक आरोग्य संघटनेनुसार (WHO) प्रतिवर्षी ७ लाख २० सहस्र लोक आत्महत्येने मृत्यूमुखी पावतात. आत्महत्या हे जगभरात सर्वाधिक मृत्यूचे तिसरे कारण असून त्यात १५ ते २९ वर्षे वयोगटाचा अधिक समावेश आहे. जागतिकस्तरावर ७३ टक्के आत्महत्या ही अल्प किंवा मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये आढळून येते. भारतातही आत्महत्या होतात. सर्वाधिक मृत्यूचे तिसरे कारण असून प्रतिवर्षी १ लाखाहूनही अधिक लोक आत्महत्या करतात.

१० सप्टेंबर हा दिवस जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. त्यामागे पुढील उद्देश आहे. आत्महत्येचे विचार येणार्‍या लोकांमध्ये आणि समाजामध्ये जनजागृती होऊन अशा व्यक्तींना त्वरित साहाय्य मिळून आत्महत्या मुळे होणारे मृत्यू टाळावे. यावर्षीही आपण ‘Changing the narrative on Suicide’ (आत्महत्येबद्दल दृष्टिकोन पालटणे) ही त्रैवार्षिक संकल्पना साजरी करत आहोत. समाजातील प्रत्येक व्यक्तीमध्ये या विषयाचे सखोल ज्ञान असणे अत्यंत आवश्यक आहे. ज्यामुळे आपण आत्महत्येमुळे होणारा मृत्यू सहज टाळू शकतो.

सर्वप्रथम हे समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे की, आत्महत्येचे विचार मनात येणे, हे टोकाच्या भावनिक अस्वस्थतेचे लक्षण असून ही अवस्था कुणालाही अनुभवायला येऊ शकते. त्यामागे जैवी-मनो-सामाजिक अशी ३ प्रकारची मुख्य कारणे असू शकतात. जैविक पातळीवर मेंदूतील सिरोटोनिन द्रव्य आणि काही जनुके किंवा कौटुंबिक इतिहास याच्याशी निगडित मानसिक आजार असल्याचे अनेक अभ्यास आता झाले आहेत. मानसिक पातळीवर स्वभावदोष, टोकाचा उतावीळपणा, सामाजिक पातळीवर आर्थिक विषमता, व्यसनाधीनता, अयशस्वी प्रेमसंबंध, अपयश, प्रिय किंवा जवळच्या व्यक्तीचा मृत्यू, कामाचा ताणतणाव, लैंगिक शोषणाचा बळी या गोष्टीच्या मिश्रणातून हे विचार जन्म घेतात.

आत्महत्या आणि आत्मघातकी विचारांची चिन्हे पुढीलप्रमाणे आहेत. मृत्यूबद्दल बोलणे आणि मरणाची इच्छा आहे असे सांगणे, चिंतेत किंवा बेपर्वाईने वागणे, कुटुंब आणि मित्रांना निरोप, स्वतःला वेगळे करणे, दारू आणि अमली पदार्थांचे अति सेवन करणे, आयुष्यात पुढे जाण्याचे कारण नाही असे वाटणे, झोपेचा त्रास जाणवणे, प्राणघातक वस्तूंचा उदाहरणार्थ गोळ्या आणि विष यांचा साठा करणे.

योग्य माहिती आणि जागरूकतेचा अभाव, योग्य संवादाचा अभाव, एकटेपणा, अपेक्षा पूर्ण न होण्याची भीती, अपराधीपणाची भावना, राग किंवा आवेगावर नियंत्रण नसणे, ज्ञानाचा अभाव (गंभीर घातकी गोष्ट), अपुरा सामाजिक आणि कौटुंबिक आधार, दुर्लक्ष किंवा तुटलेले कुटुंब, उपचारांसाठी साहाय्य न घेणे, समस्या असल्यास नकार, चुकीची धारणा किंवा घटनेचा गैरसमज, अनुचित किंवा वाईट आदर्श, मानसिक आजार हे कलंक समजणे.

आत्महत्येसारख्या गंभीर समस्येला तोंड देण्यासाठी प्रादेशिक मनोरुग्णालय हे रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. संघमित्रा फुले यांच्या मार्गदर्शनाखाली उत्स्फूर्तपणे काम करते. या रुग्णालयाच्या मानसिक आरोग्य संघामध्ये उपअधीक्षक आणि मनोविकार तज्ञ वर्ग १ डॉ. हरिणाक्षी गोसावी, मनोविकार तज्ञ डॉ. संजय कलकुटगी आणि डॉ. राहुल मोगले, वैद्यकीय अधिकारी डॉ शुभम तवर, व्यावसोपचार तज्ञ डॉ. प्रिन्सी टी, अधिसेविका श्रीमती नाचणकर आणि मनोरुग्णतज्ञ परिचारिका रितिका गावडे एकजूट होऊन काम काम करतात.

रुग्णालयामध्ये बाह्य रुग्ण विभागात औषधोपचार आणि वैयक्तिक समुपदेशन, गरजेच्या रुग्णास आंतररुग्ण सेवा आणि ओषधोपचार, आंतररुग्ण विभागात बारकाईने निरीक्षण, सुरक्षित वातावरण, व्यावसोपचार विभागाच्या वतीने वेगवेगळे उपक्रम आणि ‘डे केअर सेंटर’ची सुविधा, मानसिक आजार आत्महत्या प्रतिबंध, टेलिमानस हेल्पलाइन (१४४१६) अशा प्रमुख विषयांवर जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येतात. १४४१६ हा टोल फ्री क्रमांक असून रुग्ण आणि नातेवाइक स्वतःच्या घरातून मार्गदर्शन घेवू शकतात. – डॉ. संघमित्रा फुले, अधीक्षक, प्रादेशिक मनोरुग्णालय, रत्नागिरी.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:24 10-09-2025