Rtnadurg Fort : रत्नदुर्ग किल्ल्यांवर अमृतमहोत्सवी स्वच्छता व दुर्गसंवर्धन मोहीम

रत्नागिरी : साडेतीनशे वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेसाठी उभारलेले गडकिल्ले आज दुर्लक्षित अवस्थेत आहेत. या किल्ल्यांचे जतन व संवर्धन व्हावे या उद्देशाने कार्यरत असलेल्या राजा शिवछत्रपती परिवार, महाराष्ट्र या संस्थेमार्फत १४ सप्टेंबर रोजी रत्नागिरीतील किल्ले रत्नदुर्ग येथे अमृतमहोत्सवी (७५ वी) स्वच्छता व दुर्गसंवर्धन मोहीम राबवली जाणार आहे.

भारतीय सैन्यात कार्यरत सांगलीचे सुनील सुर्यवंशी यांनी ३१ जुलै २०१४ रोजी स्थापन केलेल्या या संस्थेचे आज महाराष्ट्रातील ३२ जिल्ह्यांमध्ये २१ विभाग कार्यरत आहेत. प्रत्येक विभागामार्फत दर महिन्याला एका रविवारी जवळच्या किल्ल्यावर किंवा ऐतिहासिक ठिकाणी स्वच्छता मोहिमा घेतल्या जातात. रत्नागिरी विभागाने गेल्या आठ वर्षांत रत्नदुर्ग, जयगड, पूर्णगड, यशवंतगड, आंबोळगड, गोविंदगड, सुवर्णदुर्ग, सिंधुदुर्ग, रामगड, भरतगड यांसारख्या कित्त्यांवर आणि संगमेश्वरमधील ऐतिहासिक मंदिरांमध्ये मिळून ७४ स्वच्छता मोहिमा यशस्वीरीत्या पार पाडल्या आहेत.

आगामी १४ सप्टेंबर रोजी होणाऱ्या अमृतमहोत्सवी मोहिमेत हातिस, जयगड, आंबेशेत, जैतापूर, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर, सांगली, गोवा, सावंतवाडी आदी ठिकाणांहून शिवप्रेमी व परिवाराचे सदस्य सहभागी होणार आहेत. स्थानिक शिवप्रेमी व विविध सामाजिक संस्थांनी या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन रत्नागिरी विभाग प्रमुख श्री. दिनेश कुर्ते यांनी केले आहे.

मोहीमेसंदर्भातील अधिक माहितीसाठी इच्छुकांनी विभाग प्रमुख श्री. दिनेश कुर्ते (मो. ७३८५२२३०६९) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन राजा शिवछत्रपती परिवार, रत्नागिरी विभागामार्फत करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:23 PM 10/Sep/2025