Ratnagiri: वाटद तिहेरी हत्याकांडातील आरोपींना फाशी द्या; भाजप जिल्हाध्यक्ष राजेश सावंत आक्रमक

रत्नागिरी : तालुक्यातील वाटद खंडाळा परिसरात घडलेल्या भीषण तिहेरी हत्याकांडामुळे संपूर्ण जिल्हा हादरला आहे. या अमानुष कृत्यातील आरोपींना फाशीची कठोरातील कठोर शिक्षा व्हावी, अशी आक्रमक मागणी भाजपचे दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश विनायक सावंत यांनी केली आहे. या मागणीसाठी त्यांनी रत्नागिरीच्या पोलिस अधीक्षकांना निवेदन सादर केले असून, या प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करून पीडित कुटुंबाला तातडीने न्याय देण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.

या हत्याकांडानंतर वाटद आणि आसपासच्या परिसरात भीतीचे आणि दहशतीचे वातावरण पसरले आहे, असे सावंत यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे. या निवेदनाद्वारे त्यांनी पोलिसांकडे काही प्रमुख मागण्या केल्या आहेत, ज्यामुळे या प्रकरणाचा तपास योग्य दिशेने होऊन भविष्यात अशा घटनांना आळा बसेल.

निवेदनातील प्रमुख मागण्या:

स्वतंत्र चौकशी अधिकारी नेमा: या हत्याकांडाच्या तपासासाठी स्वतंत्र चौकशी अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात यावी, कारण सध्याचे अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात असल्याची चर्चा आहे.

‘सायली बार’ कायमचा बंद करा: ज्या ‘सायली देशी बार’ मध्ये हे हत्याकांड घडले, तो बार कायमस्वरूपी बंद करण्यासाठी पोलिसांनी संबंधित उत्पादन शुल्क विभागाला तातडीने अहवाल सादर करावा.

अवैध धंद्यांवर कारवाई करा: रत्नागिरीतील औद्योगिक वसाहतीचा (एमआयडीसी) विकास वेगाने होत आहे. या परिसरातील वाढते अवैध दारू धंदे, मटका, जुगार आणि अंमली पदार्थांचे अड्डे कायमस्वरूपी बंद करण्यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम राबवावी.

सखोल तपास करा: या गुन्ह्यात आणखी काही आरोपी सहभागी आहेत का, याचा बारकाईने तपास करून सर्वांना कायद्याच्या चौकटीत आणावे.

पीडित कुटुंबाला संरक्षण द्या: पीडित कुटुंबाला तातडीने पोलिस संरक्षण आणि सर्वतोपरी शासकीय मदत पुरवण्यात यावी.

प्रकरण राज्य पातळीवर पोहोचले

हे निवेदन देतेवेळी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्यासोबत रत्नागिरी उत्तरचे तालुकाध्यक्ष विवेक सुर्वे आणि अन्य भाजप पदाधिकारी उपस्थित होते. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन निवेदनाच्या प्रती राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, मंत्री नितेश राणे आणि कोकण विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक (आय.जी.) यांनाही पाठवण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता या प्रकरणावर राज्य सरकार काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:53 10-09-2025