चिपळूण : तालुक्यातील अलोरे येथे जलजीवन मिशन योजनेंतर्गत सुधारित नळपाणी योजनेसाठी अडीच वर्षापूर्वी ठेकेदाराची नियुक्ती झाली; मात्र किरकोळ काम केल्यानंतर गेल्या दोन वर्षापासून योजना ठप्प आहे. ग्रामपंचायतीला विश्वासात घेतल्याशिवाय ठेकेदाराला बिल देऊ नये, असे कळवले असूनही पाणीपुरवठा विभागाने ४९ लाख ६५ हजार ठेकेदाराला दिले आहेत. यावरून सोमवारी ग्रामपंचायतीत झालेली ग्रामसभा प्रचंड गाजली. पाणीपुरवठ्याचे अधिकारी दाद देत नसल्याने यापुढे विभागीय आयुक्तांकडे तक्रार करून उपोषण करण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे.
या पाणीयोजनेच्या कामी वर्कऑर्डर सबंधित ठेकेदाराला ८ मार्च २०२३ रोजी देण्यात आली; मात्र अडीच वर्षाचा कालावधी लोटल्यानंतरही काम पूर्ण झालेले नाही. काही त्रुटी असल्याने याबाबत ग्रामपंचायत स्तरावर चर्चा झाली, त्यानुसार जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाने अंदाजपत्रकानुसार काम झाल्याची तपासणी करावी, ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन कामे पूर्ण झाल्यावरच बिल द्यावे, असे लेखी निवेदन ग्रामपंचायतीकडून दिले गेले; मात्र तरीही यावर जिल्हा प्रशासनाने कार्यवाही केली नाही. याबाबत पंचायत समिती, गटविकास अधिकारी यांच्याकडे पाठपुरावा ग्रामस्थांनी केला; मात्र कामात गैरव्यवहार आहे किंवा नाही, याची खात्री केल्याशिवाय ग्रामपंचायतीला विश्वासात घेतल्याशिवाय ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने ४९ लाख ६५ हजार १७२ इतके बिल सदर ठेकेदाराला अदा केले. दरम्यान, याबाबत सोमवारी सरपंच सिद्धी चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायतीच्या झालेल्या ग्रामसभेत उपस्थित ग्रामस्थांनी प्रश्न उपस्थित केला. इतका खर्च होऊनही ग्रामस्थांना या योजनेतून एक लिटरही पाणी मिळालेले नाही.
यापूर्वी अपूर्ण योजनेवरून उपोषणाचा इशारा दिल्यानंतर जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून संबंधित विभागाला तातडीने दखल घेण्यात घेण्यास कळवले व उपोषण न करण्यासाठी आवाहन केले. त्यानुसार उपोषण स्थगित करण्यात आले; मात्र त्यानंतर देखील अद्याप मक्तेदार व अधिकारी यांनी काम सुरू केलेले नाही. त्यामुळे या गंभीर विषयाबाबतही ग्रामसभेत मक्तेदार व अधिकारी यांच्या मनमानी कारभारावर नाराजी व्यक्त करत ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला. या प्रकरणी जबाबदार अभियंत्यावर, अधिकारों यांच्यावर कारवाईसाठी ठराव करून पत्रव्यवहार करण्याचे ठरवले. प्रशासनाने दखल न घेतल्यास उपोषण करण्याचा इशारादेखील ग्रामस्थांनी दिला आहे.
ग्रामस्थांचे पाण्याविना हाल
या योजनेचे काम अद्याप अपूर्ण असून, अलोरे येथे काही ठिकाणी जुनी पाणीलाईन नादुरुस्त असल्याने देवरेवाडी व इतर ठिकाणी ग्रामस्थांना पाण्याचे हाल सोसावे लागत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:15 PM 10/Sep/2025













