रत्नागिरी – रत्नागिरीतील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आज दुपारी एका माथेफिरू व्यक्तीने चांगलाच धुमाकूळ घातला. हातामध्ये दगड आणि फरशीचा तुकडा घेऊन तो नागरिकांना जीवे मारण्याची धमकी देत होता. मात्र, जिल्हा परिषद कर्मचारी राजू जाधव आणि सिव्हिल हॉस्पिटलचे कर्मचारी अमित जाधव यांनी धाडस दाखवून त्याला पकडल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित व्यक्ती ड्रेसिंग करण्यासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आला होता. डॉक्टरांनी त्याच्या जखमेवर ड्रेसिंग केल्यानंतर त्याने अचानक डॉक्टरांवरच हल्ला केला. त्याने ड्रेसिंगसाठी वापरला जाणारा चिमटा घेऊन डॉक्टरांना मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तो हॉस्पिटलच्या बाहेर आला आणि रस्त्यावर गोंधळ घालू लागला.
हातात दगड आणि फरशीचा तुकडा घेऊन तो “तुम्ही सगळे मरणार” असे ओरडत नागरिकांच्या अंगावर धावत होता. त्याला शांत करण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांनाही तो धमकावत होता. यामुळे हॉस्पिटल परिसरात एकच गोंधळ उडाला आणि लोक घाबरून सैरावैरा पळू लागले.
या गोंधळात जिल्हा परिषद कर्मचारी राजू जाधव हे आपल्या वरिष्ठांना भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये आले होते. त्यांनी तात्काळ परिस्थितीचे गांभीर्य ओळखले आणि पुढे सरसावले. त्यांच्या मदतीला सिव्हिल हॉस्पिटलचे कर्मचारी अमित जाधव देखील धावले. दोघांनी मिळून मोठ्या धाडसाने त्या माथेफिरू व्यक्तीला पकडले आणि त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यांच्या या समयसूचकतेमुळे आणि धाडसामुळे कोणत्याही प्रकारची दुखापत झाली नाही आणि परिस्थिती नियंत्रणात आली. या अचानक घडलेल्या प्रकाराने काही काळ गोंधळाचे आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.












