खेड : खेड बसस्थानकातून ग्रामीण भागासह लांबपल्ल्याच्या मार्गावर मार्गस्थ होणाऱ्या बसफेऱ्यांमध्ये तांत्रिक बिघाडाचे सत्र थांबेनासे झाले आहे. भररस्त्यातच बंद पडणाऱ्या बसफेऱ्यामुळे प्रवाशांना तिष्ठत बसावे लागत आहे. येथील बसस्थानकातून मार्गस्थ झालेली खेड-विरार बस भरणेनजीक भररस्त्यातच बंद पडली.
दुसऱ्या बसची व्यवस्था होईपर्यंत गणेशभक्तांना ताटकळत उभे रहावे लागले. अखेर दुसरी बस दाखल झाल्यावर खोळंबलेले प्रवासी मार्गस्थ झाले. प्रवाशांच्या सेवेसाठी असा डांगोरा पिटणाऱ्या एसटी प्रशासनाच्या कारभाराचे धिंडवडे निघत आहेत. नादुरुस्त स्थितीतील मार्गस्थ होणाऱ्या बसफेऱ्यांमुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. येथील एसटी प्रशासनाकडून प्रवाशांना दर्जेदार सेवा देण्याचा खटाटोप सुरू असला तरी ताफ्यातील भंगार अन् नादुरुस्त बसफेऱ्या भर रस्त्यातच बंद पडत असल्याने प्रवाशांना फटका बसत आहे. चार दिवसांपूर्वीच गणेशभक्तांना घेवून येथील आगारातून मार्गस्थ झालेल्या खेड-विरार बसफेरीच्या इंजिनने पेट घेतला होता.
चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली होती. ही घटना ताजी असतानाच शनिवारी येथील आगारातून मार्गस्थ झालेली बसफेरी भरणे येथे अचानक बंद पडली. गणेभक्त खोळंबलेले असतानाच दुसऱ्या बसमधून प्रवाशांची व्यवस्था करण्यात आली. या प्रकारानंतर गणेशभक्तांनी एसटी प्रशासनाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:06 AM 11/Sep/2025













