रत्नागिरी : जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने ऑगस्ट महिन्यात जात प्रमाणपत्रांची पडताळणी जलद गतीने करत एकूण ४९३ प्रकरणे निकाली काढली असून यात सर्वाधिक म्हणजे ४८८ प्रकरणे वैध ठरली आहेत.
समितीच्या मासिक प्रगती अहवालानुसार, जुलै २०२५ च्या अखेरीस रत्नागिरी समितीकडे ३७६ प्रकरणे प्रलंबित होती. ऑगस्ट महिन्यात समितीला ३६९ नवीन अर्ज प्राप्त झाले, ज्यामुळे एकूण प्रकरणांची संख्या ७४५ वर पोहोचली. यापैकी, समितीने ४८८ प्रकरणे वैध ठरवली आणि ५ प्रकरणे इतर कारणांमुळे निकाली काढली. या यशस्वी कामगिरीनंतर ऑगस्ट २०२५ च्या अखेरीस एकूण २५२ प्रकरणे प्रक्रियेत प्रलंबित आहेत.
सद्यस्थितीत प्रलंबित असलेल्या २५२ प्रकरणांपैकी १६४ प्रकरणे एका महिन्यापेक्ष कमी कालावधीची आहेत. ७१ प्रकरणे ४५ दिवसांच्या आतील आहेत. तर, १७ प्रकरणे ४५ दिवसांपेक्षा जास्त आणि ३ महिन्यांपेक्षा कमी कालावधीसाठी प्रलंबित आहेत.
या आकडेवारीवरून हे स्पष्ट होते की समिती नवीन प्रकरणांवर तातडीने कार्यवाही करत आहे आणि जुनी प्रकरणे लवकरात लवकर निकाली काढण्यासाठी प्रयत्नशील आहे. नागरिकांना जलद आणि अचूक प्रमाणपत्र वितरण करून सेवेत पारदर्शकत आणणे आणि प्रलंबित प्रकरणांचे नियोजन योग्य पद्धतीने करणे हा समितीचा मुख्य उद्देश असल्याचे समितीच्यावतीने सांगण्यात आले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:24 AM 11/Sep/2025













