खेड : लोटे एम.आय.डी.सी. परिसरातील हिंदुस्थान कोकाकोला कंपनीच्या गेटबाहेरील रस्त्यावर दि. ८ सप्टेंबर रोजी रात्री ९ ते ९.२० वाजण्याच्या दरम्यान बेकायदेशीर जमाव जमल्याप्रकरणी खेड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी विजयकुमार सुरेंद्र बहादुर सिंग (वय ४२, रा. उमर रेसिडेन्सी, दाभीळ, खेड, मूळगाव बारादेव, आमेठी, उत्तरप्रदेश) यांनी तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केल्यानुसार ते घरी जेवण करीत असताना संशयित आरोपी संजय बुरटे (रा. असगणी, ता. खेड) यांनी फोन करून कास्ट सुलोसनीम ट्रान्सपोर्ट प्रा. लि. कंपनीच्या गाड्या थांबवल्याची माहिती दिली.
त्यानंतर ते घटनास्थळी पोहोचले असता संशयित आरोपी संजय बुरटे आणि इतर १० ते १२ अनोळखी इसमांनी गाड्यांची कागदपत्रे तपासून परत केली. मात्र त्यावेळी त्यांना शिवीगाळ करण्यात आली. यातील एका अनोळखी इसमाने त्यांना मारहाण केली व परत या ठिकाणी दिसलास तर हातपाय तोडून टाकीन अशी सिंग यांना धमकी दिली. या प्रकरणी खेड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. घटनेची नोंद ९ सप्टेंबर रोजी मध्यरात्री १२.२० वाजता घेण्यात आली असून पोलिस अधिक तपास करीत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:34 AM 11/Sep/2025













