लांजा : ‘हम सब एक है… महाविकास आघाडीचा विजय असो… अशा जोरदार घोषणा देत लांजात बुधवारी महाविकास आघाडी लांजा तालुका जनसुरक्षा विधेयक विरोधी संघर्ष समितीच्यावतीने येथील तहसील कार्यालयासमोर निर्धार आंदोलन छेडण्यात आले. यावेळी आंदोलकांकडून लांजाचे नायब तहसीलदार अनिल गोसावी यांनी निवेदन स्वीकारले. या आंदोलनात महाविकास आघाडी लांजा तालुक्यातील सर्व घटक पक्ष सहभागी झाले होते.
तहसिलदारांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक २०२४ विधीमंडळाच्या अधिवेशनात बहुमताच्या जोरावर मंजूर करण्यात आलेले घटनाविरोधी आणि लोकशाहीला बाधक विधेयक आहे. जनतेच्या मूलभूत हक्कांवर गदा आणणारे आहे.
विधेयक मंजूर करण्यापूर्वी विधीमंडळाच्या संयुक्त समितीकडे पाठविण्यात आले होते. या समितीने जाहीर केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन त्यानुसार आजपर्यंत दिलेल्या तारखेला या विधेयकाला प्रत्यक्ष व दिलेल्या संकेतस्थळावर सूचना व विरोध नोंदवण्यात आला आहे. राज्यभरातून १३ हजार हरकती दाखल करण्यात आलेल्या होत्या. त्यापैकी ९ हजार ५०० हरकती विधेयक रद्द करा, हे स्पष्ट मांडणाऱ्या होत्या. एवढ्या मोठ्या प्रमाणावर हरकती दाखल होण्याचे हे पहिलेच उदाहरण आहे. हा जुलमी कायदा असून लोकशाही तत्त्वांना बाधा आणणारा आणि सत्ताधारी प्रशासनाला जास्त अधिकार प्रदान करून नागरिकांच्या हक्कांची गळचेपी करणारा आहे.
त्यामुळे हे विधेयक रद्द करावे अशी अग्रही मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. आंदोलनात काँग्रेस जिल्हाध्यक्ष नुरुद्दीन सय्यद, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हा प्रमुख दत्ता कदम, उपजिल्हा प्रमुख रवींद्र डोळस, तालुकाप्रमुख सुरेश करंबेळे, काँग्रेस तालुका अध्यक्ष राजेश राणे, प्रकाश लांजेकर, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष अनंत उर्फ बापू जाधव, शमा थोडगे, दाजी गडहिरे, युवराज हांदे, शिवगण, भिकाजी कांबळे, राजू सुर्वे यांसह महाविकास आघाडी घटक पक्षांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:05 AM 11/Sep/2025













