खेड : लोटे औद्योगिक वसाहतीतील सामायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्रातून (सीईटीपी) सोडले जाणारे पाणी आता थेट दाभोळखाडीपर्यंत पोहोचणार आहे. करंबवणेजवळ संपणाऱ्या पाईपलाईनचा अडीच कि. मी. विस्तार करत ती मालदोलीच्या पुढे नेण्याचा निर्णय झाला असून, या कामासाठी एमआयडीसीकडून तब्बल ३० कोटींचा निधी मंजूर झाला आहे. मुंबईस्थित कंपनीने प्रत्यक्ष कामालाही सुरुवात केली आहे.
सध्या लोटे परशुराम औद्योगिक क्षेत्रातील प्रक्रिया केलेले सांडपाणी ६३० मि.मी. व्यासाच्या एचडीपीई पाईपलाईनमधून कोतवलीमार्गे करंबवणेजवळील वाशिष्ठी-जगबुडी नदी संगमात सोडले जाते. ही पाईपलाईन साडेसात कि.मी. लांब आहे.
नवा विस्तार दाभोळकडे
नदीपात्राच्या अरुंद व संवेदनशील भागामुळे पाईपलाईनचा शेवट पुढे दाभोळखाडीच्या तळाशी नेण्यात येणार आहे. या भागात पाण्याची खोली व वहनक्षमता जास्त असल्याने प्रक्रिया केलेले सांडपाणी सुरक्षितपणे दूरवर सोडले जाईल. आयआयटीच्या अभ्यास अहवालानुसार या निर्णयामुळे जलगुणवत्ता सुधारेल व प्रदूषणाचा धोका कमी होईल.
आवश्यक एचडीपीई पाईप करंबवणे येथे साठवून ठेवले आहेत. पावसामुळे प्रत्यक्ष काम काही दिवस थांबले असले तरी उर्वरित कामे सुरू आहेत. औद्योगिक क्षेत्राच्या वाढीसोबतच पर्यावरणाचा समतोल साधण्याचा हा प्रकल्प महत्त्वाचा ठरेल, अशी अधिकाऱ्यांची अपेक्षा आहे.
करंबवणे सुटले, मालदोलीत धास्ती
करंबवणे परिसरातील प्रदूषणाचा त्रास कमी होणार असला तरी पाईपलाईनचा शेवट ज्या मालदोली भागात होणार आहे, तेथील मच्छीमार सध्या चिंतेत आहेत. दाभोळखाडी हा मत्स्यव्यवसायाचा मुख्य आधार असून हजारो कुटुंबांची उपजीविका यावर अवलंबून आहे. त्यामुळे पाईपलाईनचा फटका बसू शकतो, अशी भीती स्थानिकांनी व्यक्त केली आहे. औद्योगिक प्रगतीसाठी मोलाचा ठरणारा हा प्रकल्प असला तरी स्थानिक मच्छिमारांच्या शंकांना उत्तरे देणे व विश्वास मिळवणे हा मोठा प्रश्न ठरणार आहे
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:17 AM 11/Sep/2025













