दापोली : हर्णे समुद्रकिनारी डॉल्फिन मृतावस्थेत आढळून आला. ७ सप्टेंबरला वनविभागाला उशिरा माहिती मिळाली. त्यानंतर वनविभाग कार्यवाही करण्यासाठी गेले असता तिथे डॉल्फिन आढळला नाही, अशी माहिती वनविभागाचे अधिकारी प्रकाश पाटील यांनी दिली. त्यामुळे त्या मृत डॉल्फिनवर कोणतीही कार्यवाही झाली नाही.
हर्णे बंदरातील मासळी व्यापारी असलम अकबानी यांना किल्ला कनकदुर्ग व फत्तेगड यांच्यामधील खडकाळ भागात डॉल्फिन दिसून आला. सुरुवातीला हा डॉल्फिन जिवंत असल्याचा भास झाल्याने त्यांनी त्वरित आपल्या कामगारांना बोलावले आणि त्याला पुन्हा पाण्यात सोडण्याचा न प्रयत्न करण्याचे ठरवले, मात्र जवळ जाऊन पाहिले असता डॉल्फिन मृत असल्याचे स्पष्ट झाले.
प्राथमिक अंदाजानुसार, या डॉल्फिनला मोठ्या बोटीचा धक्का लागल्याने त्याचा मृत्यू झाला असावा, अशी शक्यता अकबानी यांनी व्यक्त केली. या घटनेची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना उशिरा मिळाली. त्यामुळे वन विभागाचे कर्मचारी पुढील कार्यवाहीसाठी ७सप्टेंबरला सायंकाळी समुद्रकिनारी आले होते. समुद्रकिनारी आले असता तेथे डॉल्फिनचे पिल्लू आढळून आले नाही. संपूर्ण किनारपट्टीला शोध घेण्यात आला तरीही मृत डॉल्फिनचे पिल्लू सापडले नाही.
शोधासाठी दोन कर्मचारी नियुक्त
डॉल्फिन हा रात्रीच्या समुद्राच्या भरतीमध्ये वाहून गेला असल्याचा अंदाज स्थानिकांकडून वर्तविण्यात आला. याबाबत वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता डॉल्फिनचा शोध संपूर्ण किनारपट्टीला वनविभागाचे कर्मचारी घेत आहेत. त्यासाठी दोन कर्मचारी नेमले आहेत, अशी माहिती वनविभागाचे अधिकारी प्रकाश पाटील यांनी दिली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:21 PM 11/Sep/2025













