रत्नागिरी : संजय गांधी निराधार योजनेसह आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती योजनेचा मोठा आधार जिल्ह्यातील निराधार, अपंग, विधवा आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना मिळत आहे. शासनाच्या कॅबिनेटच्या बैठकीत या दोन्ही योजनेतील लाभार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या अनुदानामध्ये हजार रुपयांची वाढ केली आहे. १५०० रुपयांऐवजी आता २५०० रुपये मिळणार आहेत. जिल्ह्यातील २३ हजार ५० संजय गांधी निराधार योजनेतील आणि १६ हजार ३४० श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांना याचा लाभ होणार आहे. तेवढाच आर्थिक भार मात्र शासनाच्या तिजोरीवर पडणार आहे.
जिल्ह्यात संजय गांधी निराधार योजनेचा एकूण २३ हजार ५० नागरिकांना लाभ मिळत आहे. यामध्ये अनुसूचित जातीमधील १,८६६ आणि अनुसूचित जमातीमधील ५४ लाभार्थी आहेत. याशिवाय, इतर योजनांचे लाभार्थी आहेत. यापूर्वी त्यांना दरमहा १५०० रुपये अनुदान मिळत होते. शासनाने त्यामध्ये वाढ करून आता २ हजार ५०० रुपये केले आहे. तसेच इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजनेचे ६,७६९ लाभार्थी आहेत. इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजनेचे १,३७६ लाभार्थी आहेत. इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजनेचा लाभ घेणाऱ्यांची संख्या २२८ आहे. राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेतून एकूण ५२ लाभार्थ्यांना मदत मिळाली आहे. संजय गांधी निराधार योजनेत रत्नागिरी तालुक्यात सर्वाधिक ३,७१४ लाभार्थी आहेत तर त्या पाठोपाठ चिपळूण ३१७३, खेडमध्ये ३१७०, संगमेश्वरमध्ये ३१५६, दापोलीत २८५८, गुहागरमध्ये २४९४, राजापूर २२२५ आणि लांजा तालुक्यात १५४८ व मंडणगड तालुक्यात ७०७ लाभार्थी आहेत.
श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना खेडमध्ये सर्वाधिक २०५७त्यानंतर चिपळूण २०५६, संगमेश्वर २५५५, दापोली २०२९, राजापूर १९३९, रत्नागिरी १७९१, लांजा १५६४, गुहागर १६५२, मंडणगड ६९७ असे एकूण १६ हजार ३४० लाभार्थ्यांना वाढीव निधीचा लाभ मिळणार आहे. या सरकारी योजनांचा फायदा तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचत आहे आणि गरजू लोकांना आर्थिक आधार मिळत आहे.
‘इंदिरा गांधी वृद्धापकाळ’चे ६७६९ लाभार्थी
इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजनेत संगमेश्वर आणि चिपळूण तालुक्यात सर्वाधिक लाभार्थी आहेत. त्यांची संख्या अनुक्रमे १५५७ आणि ९४१ इतकी आहे तर त्या खालोखाल दापोलीत ८१७, गुहागर ७३५, लांजा ७३४, राजापूर ७०५, खेड ५७०, रत्नागिरी ४८८ मंडणगड २२२ इतकी लाभार्थी संख्या आहे. एकूण ६७६९ लाभार्थी जिल्ह्यात आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:29 PM 11/Sep/2025













