Mandangad : टाकवली गावात अनिष्ठ प्रथांना तिलांजली

मंडणगड : तालुक्यातील टाकवली गावात अनिष्ठ प्रथा बंद करण्यात आल्या आहेत. नुकत्याच ग्रामस्थ, मुंबईकर आणि महिला मंडळ ग्रामस्थांच्या झालेल्या बैठकीत विविध प्रथा कालानुरूप बंद करण्याचा ऐतिहासिक निर्णयाचा ठरावच यावेळी घेण्यात आला आहे.

सभेमध्ये वायफळ, खर्चिक जुन्या चालीरीती बंद करून युगात आर्थिक नासधूस टाळण्यासाठी गावातील गोरगरीब सर्वांचा विचार करून हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. यामध्ये लग्न कार्यातील हळदी समारंभात मद्यपान व मांसाहार यावर बंदी, गावातील जमीन विकण्याला बंदी, जर का तशी गरज एखाद्या सभासदाला भासली तर त्याची गाव योग्य ती आर्थिक व्यवस्था करेल.

सुख दुःखात कपड्यांचा आहेर करण्याची पद्धतसुद्धा बंद करण्यात आली आहे. शिमगा सणामध्येदेखील आपली श्रद्धा जोपासताना काही खर्चिक व नासधूस होणाऱ्या गोष्टीना आळा घालण्याचे निर्णयही घेण्यात आले आहेत. याचबरोबर गावात सार्वजनिक कार्यक्रमांत मद्यपान करण्यावरही बंदी घालण्यात आली आहे.

गावातील सामाजिक ऐक्य, एकता, संघटीतपणा टिकवण्यासाठी गावाचे स्थानिक ग्रामस्थ मंडळ, मुंबई मंडळ व महिला मंडळ यांच्या समन्वयातून गावाच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी संयुक्त सभेचे आयोजन करण्यात आले होते. गावातील ऐक्य आणि सामाजिक बांधिलकी आवाधित राहण्यासोबत विकासात्मक चर्चाही यावेळी करण्यात आली. यावेळी मंडळाचे पदाधिकारी, सदस्य, ग्रामस्थ, महिला, मुंबईकर उपस्थित होते.

विविध प्रथा व परंपरा सध्याच्या वैज्ञानिक युगात बदलेल्या गेल्या पाहिजेत. महागाई वाढल्याने सर्वांनाच प्रथेप्रमाणे वागायचे झाल्यास परवडत नाही, काही प्रथा या आर्थिक अपव्यय होण्याचाच आहेत. त्या थांबवणे गरजेचे आहे. हळदी समारंभात मद्य व मांसाहार हे अनाठायी आहे. आताची तरुणाई दारूच्या नशेकडे ओढली जात आहेत. त्यामुळे हि प्रथा बंद करणे अपरिहार्य वाटते. ग्रामस्थांनी गावातील सर्वांच्या हिताचा निर्णय घेण्याचा प्रयत्न केला आहे-मनोज काप ग्रामस्थ, पदाधिकारी, टाकवली ग्रामस्थ मुंबई मंडळ.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:42 PM 11/Sep/2025