Vilas Patne : समुद्रविज्ञान तंत्रज्ञान संबंधाने हवे स्वतंत्र विद्यापीठ – अॅड. विलास पाटणे

रत्नागिरी : कोकण कृषी विद्यापीठाने कृषी, फलोत्पादन, वन, कुरण विकास व मत्स्यविज्ञान विकास प्रादेशिक वैशिष्ट्यपूर्ण; परंतु एकात्मिक शेतीपद्धतीचा अवलंब केला आहे. डॉ. एम. एस. स्वामिनाथन समितीने याच संकल्पनेवर आधारित कृषी पदवीचा पुरस्कार केला आहे. समुद्रविज्ञान आणि पाण्याखालील तंत्रज्ञान या संबंधाने स्वतंत्र विद्यापीठ होण्याची गरज आहे, असे मत अॅड. विलास पाटणे यांनी व्यक्त केला.

अॅड. पाटणे म्हणाले, जगात माशांचे २१ हजार जाती असल्याचे सर फ्रान्सिस डे यांचे म्हणणे आहे. भारतात १६०० जातीचे मासे असून, महाराष्ट्रात ६०० प्रकारचे मासे आहेत. त्यातील ४५० खाऱ्या पाण्यात, तर १५० गोड्या पाण्यात आहेत. भारताच्या स्थूल राष्ट्रीय उत्पादनात मत्स्योत्पादनाचा केवळ १ टक्के वाटा असून, १४ कोटी ५० लाख लोक या व्यवसायावर अवलंबून आहेत. एकूण उत्पादनांपैकी मासेमारीतून ३९ टक्के तर मत्स्यसंवर्धनातून ६१ टक्के उत्पादन घेणारा भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. मत्स्यनिर्यातीमध्ये केरळ प्रथम तर महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी आहे. मुंबईसह सात सागरी जिल्ह्यात ४५६ मासेमारी करणारी गावे आहेत. कोकण किनारपट्टीवरील माशांची विविधता आपण लक्षात घेतली पाहिजे, अशी मासेमारी हा ग्रामीण शेती उत्पादनाचा
एकात्म घटक आहे, असे जगभर मानले जाते.

इंडियन कौन्सिल फॉर अॅग्रीकल्चर रिसर्च नवी दिल्ली या महत्त्वाच्या संस्थेने शेतीवर आधारित उत्पादन चालवण्याकरिता भर दिला आहे. भात व मत्स्यशेती आशिया खंडात यशाचे सूत्र म्हणून मान्यता पावली आहे. मत्स्य जीवशास्त्र, अॅक्वाकल्चर, मत्स्यप्रक्रिया तंत्रज्ञान व मत्स्य इंजिनिअरिंग या सर्व बाजू शेती विज्ञानाला संलग्न आहेत. भारतीय कृषिक्षेत्रामध्ये पिके, वृक्ष, कीटक या जीवघटकांचा समन्वय आहे.

वाढते शहरीकरण, तिवरांच्या बेटांचा नाश, माशांच्या प्रजोत्पादन काळातील मच्छीमारी, प्रदूषण तसेच लहरी निसर्ग यामुळे आधीच मच्छीमार पुरता कात्रीत सापडला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:21 PM 11/Sep/2025