देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील हरपुडे गावात तीन वर्षांपासून रखडलेली जल जीवन मिशन योजना वादग्रस्त ठरत आहे. गावातील महेंद्र घुग यांनी या योजनेबद्दल प्रश्न उपस्थित करताच, माजी सरपंच संजीवनी गुरव व त्यांचे पती संतोष गुरव यांनी थेट महेंद्र घुग यांच्या कार्यालयात घुसून त्यांना धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी घुग यांनी देवरुख पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे, पोलिसांनी दाम्पत्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३५१(२) व ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
हरपुडे गावात प्रत्येक व्यक्तीला दररोज ५५ लिटर पाणी पुरवण्याच्या उद्देशाने शासनाकडून जल जीवन मिशन योजनेला मंजुरी मिळाली होती. मात्र, या योजनेच्या कामात सुरुवातीपासूनच अनियमितता असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला होता. यामुळे ही योजना मध्येच थांबली होती. नवीन निविदा काढून कामाला पुन्हा सुरुवात झाली, परंतु काम अद्याप अर्धवट अवस्थेतच आहे. या पार्श्वभूमीवर, तक्रारदार व सहकारी प्रशांत घुग यांनी पंचायत समिती पाणीपुरवठा अधिकाऱ्यांची भेट घेतली असता त्यांना अधिकाऱ्यांनी सांगितले की, ग्रामपंचायतीकडून आवश्यक असलेले संमतीपत्र अद्याप मिळालेले नाही, त्यामुळे काम थांबले आहे.
या माहितीनंतर, तक्रारदाराने ग्रा.पं. सदस्य व मागील सरपंचांना स्पष्टीकरण देण्याची विनंती केली. या यामुळे, माजी सरपंच संजीवनी गुरव व त्यांचे पती संतोष गुरव यांनी महेंद्र घुग यांच्या देवरुखतील कार्यालयात येऊन, संतोष गुरव यांनी ‘बाहेर बघून घेऊ’ अशीही धमकी घुग यांना दिली. महेंद्र घुग यांनी याबाबत पोलिसात तक्रार केली असून आपल्या कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना पुरावा म्हणून तपासण्याची विनंती केली आहे. या प्रकरणी गुरव विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:15 AM 12/Sep/2025














