प्रतिनिधी, रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील कोतवडे येथे नामदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन उत्साहात पार पडले, मात्र या कार्यक्रमाच्या आयोजनातील त्रुटींमुळे पक्षाच्या बालेकिल्ल्यातच अंतर्गत नाराजी उफाळून आली आहे. पक्षासाठी वर्षानुवर्षे काम करणारे जुने, निष्ठावान आणि ज्येष्ठ पदाधिकारी कार्यक्रमाला उपस्थित असूनही त्यांना व्यासपीठाच्या बाहेरच उभे ठेवल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे.
कोतवडे गावात झालेल्या या कार्यक्रमावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सतीश शेवडे, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष दत्ता देसाई, पंचायत समितीचे माजी उपसभापती किसनराव घाणेकर, धामणसे गावचे सुपुत्र तथा माजी नगरसेवक उमेश कुळकर्णी आणि स्थानिक पदाधिकारी प्रकाश वारेकर यांच्यासारखे ज्येष्ठ नेते उपस्थित होते. मात्र, या सर्वांना व्यासपीठावर सन्मानाने स्थान देणे तर दूरच, साधे बोलावण्याचे सौजन्यही दाखवण्यात आले नाही अशी चर्चा आहे. यामुळे हे सर्व ज्येष्ठ पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये बाहेरच उभे राहिल्याचे चित्र पाहायला मिळाले, ज्यामुळे भाजप वर्तुळात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
या प्रकारामुळे संतप्त झालेल्या काही कार्यकर्त्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर आपली उद्विग्नता व्यक्त केली. “ज्यांनी आयुष्यभर पक्ष वाढवण्यासाठी मेहनत घेतली, त्या ज्येष्ठांना जर अशी अपमानास्पद वागणूक मिळणार असेल, तर आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी पक्षासाठी का झटावे?” असा सवाल करत त्यांनी आपली खंत व्यक्त केली.
दरम्यान, या कार्यक्रमाला मिळालेला अल्प प्रतिसादही चर्चेचा विषय ठरला आहे. भाजपचा पारंपरिक गड मानल्या जाणाऱ्या कोतवडेसारख्या गावात कार्यकर्त्यांची उपस्थिती त्यामानाने कमी होती. ज्येष्ठांचा अपमान आणि अल्प उपस्थिती या दोन्ही गोष्टींमुळे पक्षातील स्थानिक पातळीवरील गटबाजी आणि नाराजी स्पष्टपणे दिसून येत असून, या घटनेचे पडसाद आगामी काळात उमटण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:01 12-09-2025














