चिपळूण : पिंपळी येथील जुना पूल खचल्यानंतर गाणे-खडपोली एमआयडीसीवर संकट कोसळले आहे. वाहतुकीस अडथळा निर्माण झाल्याने येथील अनेक उद्योजकांची अडचण झाली आहे. या पार्श्वभूमीवर प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांनी बुधवारी उद्योजक, एमआयडीसीचे अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग यांची बैठक घेतली. अखेर या बैठकीत उद्योजकांची गैरसोय लक्षात घेऊन रात्री ८ ते पहाटे ५ पर्यंत शिरगाव पुलावरून २० टनी अवजड वाहतुकीस परवानगी देण्यात आली आहे.
पिंपळी येथील पूल खचल्यानंतर काहीच कालावधीत पेढांबे ब्रिज वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. यामुळे गाणे-खडपोलीकडे जाणाऱ्या वाहतुकीस मोठी अडचण निर्माण झाली. दसपटी विभागाकडे जाणाऱ्यांची गैरसोय होत असून त्यांना मोरवणे किंवा पेढांबे येथून वळसा घालून मार्गक्रमण करावे लागत आहे.
यामध्ये गाणे खडपोली एमआयडीसीची मोठी गैरसोय झाली आहे. उत्पादीत केलेला माल किंवा आवश्यक कच्चा माल याची ने-आण करायची कोठून? असा प्रश्न येथील उद्योजकांसमोर आहे. यामुळे उत्पादनावर त्याचा विपरित परिणाम झाला आहे.
या पार्श्वभूमीवर एमआयडीसीचे अधिकारी, उद्योजक आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची प्रांताधिकारी कार्यालयात बैठक झाली. या बैठकीमध्ये उद्योजकांच्या गैरसोयीबाबत चर्चा करण्यात आली. अखेर उद्योजकांची गैरसोय दूर करावी या हेतूने रात्री ८ ते पहाटे ५ वाजेपर्यंत शिरगाव पुलावरून पेढांबे, खडपोली मार्गे वाहतूक सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याची कार्यवाही लवकरच होणार आहे.
या मार्गावरून २० टनापर्यंत अवजड वाहतूक रात्रीच्यावेळी सुरू होणार आहे. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याच्या डागडुजीचा देखील प्रस्ताव केला आहे. त्यासाठी अडीच कोटींचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविला जाणार आहे, अशी माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली. सद्यस्थितीत या मार्गावर छोट्या वाहनांना परवानगी देण्यात आली होती. मात्र उद्योजकांची गैरसोय लक्षात घेऊन हा तोडगा काढण्यात आला आहे.
पेढांबे ब्रिज वाहतुकीस बंद असून स्थानिकांना मात्र मोठा वळसा पडत आहे. शिरगाव पुलावरून पेढांबे, खडपोली मार्गे ही अवजड वाहतूक वालोटी मार्गे बाहेर पडणार आहे, असे सांगण्यात आले. यावेळी सा. बां. विभागाचे उपअभियंता, एमएसईबीचे अधिकारी, एमआयडीसीचे अधिकारी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:03 PM 12/Sep/2025












