रत्नागिरी : गणेशोत्सव कालावधीत मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक सुरळीत राहण्यासाठी महामार्गावर २२ ऑगस्ट ते ७सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यात तीन ठिकाणी दिवसरात्र फिरत्या (वायुवेग) सहा पथकांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, गणेशभक्तांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन केल्याने वायुवेग पथकांवर यंदा कारवाई करण्याची वेळ आली नाही. मात्र, अवजड वाहतूक बंदी असूनही तिचे उल्लंघन केलेल्या १४ वाहनांवर कारवाई करून ६० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
गणेशोत्सवासाठी कल्याण, डोंबिवली, ठाणे, वसई, मुंबई येथून मोठ्या प्रमाणावर गणेशभक्त कोकण व गोवा या भागात येतात. त्यामुळे या कालावधीत मुंबई-गोवा महामार्गावर वाहतुकीची वर्दळ वाढते. या कालावधीत सुरळीत मुंबई वाहतूक ठेवण्यासाठी परिवहन आयुक्त कार्यालयाकडून वाशी (नवी मुंबई) ते कुडाळ (सिंधुदुर्ग) या मार्गावर वायुवेग पथके नियुक्ती करण्यात आली होती. रत्नागिरी जिल्ह्यात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे आणि सहायक प्रादेशिक अधिकारी अजित ताम्हणकर यांच्या मार्गदर्शनाखाली कशेडी ते चिपळूण, चिपळूण ते रत्नागिरी आणि रत्नागिरी ते राजापूर अशा तीन ठिकाणी सकाळी ६ ते दुपारी २, दुपारी २ ते रात्री १० आणि रात्री १० ते सकाळी ६ अशा तीन शिफ्टमध्ये ही सहा पथके तैनात होती.
गणेशोत्सवाच्या काळात महामार्गावर वाहनांना अडथळा किंवा कुठलीही अडचण आल्यास, अपघात झाल्यास तत्काळ दूर केली जात होती. या कालावधीत भक्तांनी वाहतूक नियमांचे पालन केल्याने वायुवेग पथकाला कारवाई करण्याची वेळ आली नाही. मात्र, या कालावधीत महामार्गावर बंदी असूनही तिचे उल्लंघन केलेल्या १४ अवजड वाहनांवर वायुवेग पथकाने कारवाई केली.
यंदा गणेशभक्तांनी वाहतूक नियमांचे पालन केल्याने अडचणी आल्या नाहीत. मात्र, अवजड बंदी असूनही वाहतूक करणाऱ्या १४ वाहनांवर कारवाई करण्यात आली. जिल्ह्यात सहा वायुवेग पथकांमध्ये २४ अधिकारी, कर्मचारी कार्यरत होते-
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:14 PM 12/Sep/2025














