चिपळूण : शासकीय रस्त्यालगत घराचे बांधकाम केल्याची तक्रार झाली. त्यावर संबंधित व्यक्तीने गावात रस्त्याच्या कडेला अशा अनेक घरांचे बांधकाम असल्याचे नमूद केले. त्यानुसार जिल्हा परिषद बांधकाम विभागाने टेरव येथील जिल्हा परिषद अखत्यारितील रस्त्यांचे रेखांकन करण्याचे ठरवले आहे. हे रेखांकन शनिवारी (ता. १३) सकाळी १० वाजता होणार आहे.
तालुक्यातील टेरव गाव नेहमीच विविध विषयांवरून तालुक्यात सातत्याने चर्चेत राहिले आहे. विविध विषयांवरून येथील ग्रामस्थांनी महिनाभर पंचायत समितीसमोर आंदोलनेदेखील केली आहेत. मागील महिन्यात टेरव येथील एकनाथ माळी यांनी तक्रार करत घडशी यांनी शासकीय रस्त्यालगत बेकायदेशीर विनापरवाना बांधकाम केल्याची तक्रार केली होती. त्यानुसार उपोषणाचा इशाराही दिला होता.
या तक्रारीवर घडशी यांनी आक्षेप घेत गावात रस्त्याच्या कडेला अनेकांनी बांधकाम केले आहे, त्यावर कारवाई कोण करणार, अशी भूमिका घेतली होती. बेकायदा विनापरवाना घरांबाबत कारवाईचे अधिकार शासनाने ग्रामपंचायतीला दिले आहेत. त्यानुसार अशा बांधकामावर ग्रामपंचायतीला बांधकाम काढून टाकण्याचा अधिकार आहे. त्यासाठी शासकीय रस्त्यांचे रेखांकन महत्त्वाचे होते. त्यामुळे टेरव ग्रामपंचायत हद्दीतील जिल्हा परिषद अखत्यारितील रस्त्याचे रेखांकन केले जाणार आहे. सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी, तक्रारदार व संबंधितांनी उपस्थित राहावे, अशी सूचना जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडून टेरव ग्रामपंचायतीला करण्यात आली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:51 AM 13/Sep/2025














