चिपळूण : चिपळूण शहरात भटक्या कुत्र्यांच्या समस्येने नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होऊ लागला आहे. गेल्या काही महिन्यांपासून भटक्या कुत्र्यांनी अनेक ज्येष्ठ नागरिकांसह शालेय विद्यार्थी व महिलांना चावे घेऊन जखमी केले आहे. भटक्या श्वानांसोबतच भटकी गुरे आणि गाढवांची समस्या शहरात वाढल्याने अपघातदेखील होऊ लागले आहेत.
आता या विरोधात शहरातील नागरिक नगर परिषद प्रशासनाकडे कठोर कार्यवाहीची मागणी करीत असून श्वानांची नसबंदी करूनही त्याचे परिणाम दिसत नसल्याने नसबंदी नियोजनाबाबत नागरिकांमधून संशय व्यक्त होऊ लागला आहे. शहरात भटक्या श्वानांनी लहान मुलांसह महिला, ज्येष्ठ नागरिकांची पळताभुई थोडी केली आहे. नागरी वस्तीसह भर वर्दळीच्या चौकात दहा ते पंधराच्या टोळक्याने फिरणारे हे भटके श्वान लहान मुलांसह पादचाऱ्यांच्या अंगावर धावून जावू लागले आहेत. काहीवेळा दुचाकी व चारचाकी वाहनांचा पाठलाग करण्याचे प्रकारही घडत आहेत. त्यामुळे वाहनांचे अपघात होत आहेत. तसेच लहान मुले खरेदी करून आणलेल्या वस्तू हातातून घरात नेत असताना हे खाद्यपदार्थ खाण्यासाठी भटके श्वान लहान मुलांना घेरत आहेत.
काही श्वानप्रेमींकडून भूतदवेच्या नावाखाली ठिकठिकाणी या श्वानांना खाद्यपदार्थ दिले जातात. त्याची सवय लागल्याने खाण्याच्या अपेक्षेने भटके श्वान लहान मुलांसह महिलांचा पाठलाग करतात. शहरात काही ठिकाणी श्वानांची टोळकी प्रामुख्याने उघड्यावरील चायनिज सेंटर, तसेच रस्त्याच्या कडेने मटण, चिकन विक्री केंद्र त्याचप्रमाणे मच्छी विक्रेते अशा ठिकाणी भटक्या श्वानांचे टोळके मोठ्या प्रमाणात घुटमळताना दिसत आहेत. रात्री उशिरापर्यंत सुरू असणाऱ्या टपरी चायनिज सेंटरकडून उरलेले पदार्थ श्वानांना देण्यात येत असल्याने ही टोळकी त्या परिसरात फिरतात. तसेच रस्त्याच्या कडेने बसलेले मच्छी विक्रेतेदेखील रात्री उशिराने टाकाऊ माल तेथेच टाकत असल्याने अशा ठिकाणी श्वानांची टोळकी ताव मारताना दिसत आहेत.
संबंधितांवर कडक कारवाईची गरज
चिपळुणात टपऱ्या उभ्या करून रात्री उशिरापर्यंत सुरू असणाऱ्या चायनिज सेंटरसहीत रस्त्याच्या कडेने मटण, मच्छी व चिकन विक्री करणाऱ्यांवर नगर परिषदेने तातडीने कारवाई करावी. शहरात मोकाटपणे फिरणाऱ्या गाढवांचा बंदोबस्त करण्यासाठी संबंधित गाढवांच्या मालकांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत. त्याचप्रमाणे भटक्या गुरांना सोडणाऱ्या मालकांवरही कारवाई केल्यास या समस्या कमी होतील, असे नागरिकांतून बोलले जात आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:18 PM 13/Sep/2025














