Ratnagiri ST Bus : गणेशोत्सवातील वाहतुकीमधून रत्नागिरी एसटी विभागाला ५ कोटी २३ लाखांचे उत्पन्न

रत्नागिरी : गणेशोत्सवानिमित्त रत्नागिरी विभागाकडून जाताना व परतीचे एकत्रित वाहतूक असे जादा एसटी बसेसचे नियोजन करण्यात आले होते. कोकणातील रत्नागिरी आगारासह इतर आगारांच्या ३ हजार ३०७ एसटी बसेस धावल्या होत्या. एकूण दहा लाख ८८ हजार ११८ किलोमीटरचा प्रवास झाला असून, त्यातून रत्नागिरी विभागाच्या एसटीला ५ कोटी २३ लाख ६३ हजार ९३५ इतके उत्पन्न मिळाले आहे. एस.टी. बसेसच्या माध्यमातून लाडका बाप्पा कोकणातील रत्नागिरी जिल्ह्याला चांगलाच पावला.

गणेशोत्सवानिमित्त लाखो कोकणकर कोकणातील आपापल्या गावी आले होते. चाकरमान्यांचा प्रवास सुखकर होण्यासाठी राज्य महामार्ग महामंडळाच्या वतीने ५,२०० गाड्या कोकणात सोडण्यात आल्या. त्यापैकी २,९३० इतक्या एसटी बसेस रत्नागिरी जिल्ह्यात दाखल झाल्या होत्या. गणपती जादा वाहतुकीबाबत जातानाची वाहतूक ६१७ फेऱ्या तून ७४ लाख १३ हजार ८३० रुपये उत्पन्न
मिळाले, तर परतीच्या वाहतुकीसाठी २,६९० गाड्या मुंबईला धावल्या. आठ लाख ६८ हजार ११५ एकूण किलोमीटर झाले असून, त्यातून चार कोटी ४९ लाख ५० हजार १०५ इतके उत्पन्न मिळाले.

जाताना व परतीचे उत्पन्न ५ कोटी २३ लाख ६३ हजार ९३५ इतके झाले आहे. आषाढी वारीत विठुराया पावला होता. त्यानंतर गणेशोत्सवात रत्नागिरी विभागास लाडका बाप्पा पावला आहे. एकंदरित, गणेशोत्सवात रत्नागिरी आगारासह इतर आगाराने चांगले नियोजन केले. तसेच काहीजणांनी ग्रुपनेही एसटी बुकिंग केले होते. भाविकांनी लालपरीतून प्रवास केल्यामुळे एसटी विभागाला चांगला प्रतिसाद मिळाला.

गणपती उत्सवात रत्नागिरी विभागाच्या वतीने जाताना व परतीच्या प्रवासासाठी जादा वाहतुकीचे नियोजन करण्यात आले होते. परतीच्या प्रवासासाठी ही मोठ्या प्रमाणात ऑनलाईन तिकीट बुकिंग झाले. ज्यादा व परतीची वाहतूक मिळून रत्नागिरी विभागास ५ कोटी २३ लाख ६३ हजार ९३५ लाखांचे उत्पन्न मिळाले. कर्मचारी, अधिकारी यांनी सर्वांनी चांगले काम केल्यामुळे हे शक्य झाले-प्रज्ञेश बोरसे, विभाग नियंत्रक, रत्नागिरी

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:49 PM 13/Sep/2025