रत्नागिरी : महिलांच्या शाश्वत विकासासाठी शिक्षण, समानता आणि सक्षमीकरण या बाबी आवश्यक आहेत. स्त्री-पुरुष हे एकमेकांचे सहभागीदार आहेत. पुरुषांशी बरोबरी किंवा स्पर्धा न करताही महिलांना समान संधी मिळायला हवी. त्यातून लिंगसमानता प्रस्थापित होऊ शकते.
महिला सक्षमीकरणातून देशाची प्रगती होणार आहे. महिलांनी शारीरिक-मानसिक आरोग्य सांभाळलेच पाहिजे. नवनवीन शिक्षण घेत राहायला हवे. स्वतः निर्णय घेऊन त्या निर्णयाची जबाबदारीही घेणे आवश्यक आहे. स्वभाव, आवड आणि बाजारातील मागणी यांचा विचार करून शिक्षण घेतल्यास यश नक्की मिळते, असे प्रतिपादन पुण्यातील रमा पुरुषोत्तम फाउंडेशनच्या संचालिका चित्रा बुझरूक यांनी येथे केले.
‘महिलांच्या शाश्वत विकासासाठी शिक्षण, समानता आणि सक्षमीकरण’ या विषयावर रत्नागिरीतल्या गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातर्फे आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसांच्या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.
प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान (पीएम-उषा) योजनेअंतर्गत महाविद्यालयाने ही परिषद आयोजित केली आहे. ही परिषद ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही स्वरूपात होत आहे. या प्रसंगी मंचावर रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीमती शिल्पाताई पटवर्धन, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, बीजभाषक डॉ. लीना बावडेकर, प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, पी. एम. उषा समन्वयक व शास्त्र शाखेच्या उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी आणि महिला विकास कक्षाच्या समन्वयक डॉ. सोनाली कदम उपस्थित होत्या. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. त्यानंतर परिषदेत सादर होणाऱ्या शोधनिबंधांच्या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांनी केले. प्रारंभी प्राचार्य डॉ. साखळकर यांनी महाविद्यालयाच्या स्थापनेपासून आतापर्यंतचा प्रगतीचा आढावा घेतला.
बुझरूक म्हणाल्या, महिलांनी शारीरिक व मानसिक आरोग्य सांभाळले पाहिजे. त्यासाठी कोणतीही सबब न सांगता चालणे, खेळ, धावणे, योगासने आवश्यक आहेत. सद्यस्थितीत तंत्रज्ञान क्षेत्रात झपाट्याने बदल होत असून, त्यासाठी नवनवीन शिक्षण घेत राहायला हवे, जिथे शिक्षणाची संधी मिळेल ती साधली पाहिजे. शिक्षणाने आपली निर्णयक्षमता विकसित होते. स्वतः निर्णय घेऊन त्या निर्णयाची जबाबदारी घेणेही आवश्यक असते. तुमचा स्वभाव, आवड आणि बाजारातील मागणी यांचा विचार करून शिक्षण घेतले तर नक्कीच यश मिळते.
बुझरूक यांनी सांगितले, की अलीकडे लग्न करताना मुलींच्या अनेक अटी असतात; पण जेव्हा तुम्ही नोकरी, व्यवसायात मोठ्या पदावर असता, तेव्हा तुमच्या मुलांचा सांभाळ घरातील वडीलधारी व्यक्ती करतात. त्यामुळे कुटुंबव्यवस्था टिकली पाहिजे. आपण नातेसंबंध जपले पाहिजेत. तसेच स्वतःचे एक नेटवर्क विकसित केले पाहिजे. प्रत्येक गोष्ट आपण स्वबळावर आणि स्वकर्तृत्वावर करतो असे नसून, त्यासाठी आपल्याला अनेकांची मदत होत असते. तसेच आपण सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे. अशा अनेक गोष्टीमुळे समाजात समानता अस्तित्वात येईल.
रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे म्हणाल्या, स्त्री सक्षमीकरण आणि सामाजिक आर्थिक-विकास या गोष्टी हातात हात घालूनच जात असतात. लिंगसमानता आपल्या घरापासूनच सुरू व्हायला हवी. रत्नागिरी जिल्ह्यात साक्षरता पूर्वीपासूनच जास्त आहे. रत्नागिरी जिल्ह्यातून देशाला पाच भारतरत्ने मिळाली आहेत. त्यामुळे महिला सक्षमीकरणाचे चांगले काम उभे राहिले.
महिला सरपंच असलेल्या गावांमध्ये समस्या समजून त्या सोडवण्याकडे कल दिसतो, असे निरीक्षण रानडे यांनी नोंदवले. यावेळी त्यांनी महिलांचे हक्क, अधिकार, संरक्षणाबाबत राज्यघटनेतील तरतुदींची सविस्तरपणे माहिती दिली. शासनाच्या दीनदयाळ अंत्योदय योजना, महिला बचत गटांचे सक्षमीकरण, उमेद योजनेचा फायदा झालेली काही उदाहरणेसुद्धा त्यांनी सांगितली. महिलेच्या नावावर घर, बेटी बचाव, बेटी पढाव योजना, स्वस्थ नारी, सक्षम परिवार या योजनासुद्धा महत्त्वाच्या आहेत. कामटाळूपणा ही घातक वृत्ती असून, त्यात पुरुष व स्त्रिया दोघांचाही समावेश होतो. नोकरदार महिलांना खूप आव्हाने असतात. आपल्याला अधिकार, कर्तव्याची जाणीव असली पाहिजे. एक महिला म्हणून आपल्या स्त्रीत्वाचा उपयोग आपल्या फायद्यासाठी न करणे हे तत्त्व पाळले तर समानता महिलांकडे चालत येणार, असेही रानडे म्हणाल्या.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:59 13-09-2025














