Ratnagiri Rain : जिल्ह्याला आज पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. काही ठिकाणी पावसाची संततधार तर काही ठिकाणी ढगाळ, उन्हाचे दर्शन झाले होते. घामामुळे नागरिक हैराण झाले होते. दरम्यान, सोमवार दि. १५ सप्टेंबर रोजी जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात मागील तीन महिन्यांत पावसाने दमदार हजेरी लावल्यानंतर सप्टेंबर महिन्यात पावसाने विश्रांती घेतली आहे. मागील चार दिवसांपासून वाढत्या उकाड्यामुळे, धुळीमुळे रत्नागिरीकर हैराण झाले आहेत. शनिवारी काही ठिकाणी तुरळक पाऊस झाला, रविवारी काही तालुक्यांत पावसाची सतत हजेरी, तर काही ठिकाणी उन्हाचे दर्शन पाहावयास मिळाले. काही ठिकाणी ढगाळ वातावरण दिसून आले. सोमवारी रत्नागिरी जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन हवामान खात्याने दिले आहे.

जिल्ह्यात १०० टक्के पाऊस
रत्नागिरी जिल्ह्यात १ जून ते १४ सप्टेंबरपर्यंत ३० हजार २६६ मिमी इतका पाऊस झाला असून, १०० टक्के पावसाने हजेरी लावली आहे. यामध्ये सर्वाधिक पाऊस खेड, गुहागर, चिपळूण, राजापूर अशा चार तालुक्यांत शंभर टक्के पाऊस, तर उर्वरित तालुक्यांत ९८ ते ९९ टक्क्यांहुन अधिक पाऊस झाला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:04 AM 15/Sep/2025