Guhagar : ओबीसी संघर्ष समन्वय समिती आज तहसील कार्यालयावर धडकणार!

गुहागर : मराठा समाजाला ओबीसीतून सरसकट कुणबी मराठा म्हणून दाखले देण्याच्या शासन अध्यादेशाच्या निषेधार्थ गुहागर तालुका ओबीसी संघर्ष समन्वय समिती हजारोंच्या संख्येने तहसीलदार कार्यालय गुहागर येथे सोमवार, दि. १५ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता धडक देऊन तहसीलदारांना निवेदन देणार आहेत.

या सर्व आंदोलनाच्या पूर्वतयारीची बैठक शृंगारतळी येथील गुहागर बाजार हॉल येथे ओबीसी संघर्ष समन्वय समितीचे अध्यक्ष पांडुरंग पाते यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. या अध्यादेशानुसार, जरी आता कुणबी मराठा आणि मराठा कुणबी असे जातीचे दाखले देण्यात येणार असले, तरी भविष्यात या निर्णयाचा विपरीत परिणाम सर्व ओबीसी घटकांवर होणार असल्याने गुहागर तालुक्यातून ओबीसी प्रवर्गात येणारे सर्व घटक समाज संघर्ष समन्वय समितीच्या माध्यमातून एकवटले आहेत.

या पूर्वतयारीच्या सभेवेळी माजी सभापती राजेश बेंडल, रामचंद्र हुमणे, ओबीसी संघर्ष समन्वय समितीचे सेक्रेटरी नीलेश सुर्वे, माजी सदस्या नेत्रा ठाकूर, पद्माकर आरेकर, प्रदीप बेंडल, गुहागर तालुका भंडारी समाजाचे अध्यक्ष नवनीत ठाकूर, नाभिक समाजाचे अध्यक्ष संजय पवार, विश्वकर्मा सुतार समाजाचे अध्यक्ष धामणस्कर, वैश्य समाजाचे अध्यक्ष अजित बेलवलकर, अॅड. प्रमेय आर्यमाने, समीर डिंगणकर आदी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:10 AM 15/Sep/2025