Ratnagiri : समुद्रकिनारी वाळूत वाहन चालवण्यास मनाई

रत्नागिरी : तीन दिवसांपूर्वी दापोली पोलिस ठाणेहद्दीतील कर्दे येथील समुद्रकिनारी महिंद्रा थार गाडी वेगाने वळणे घेत चालवताना उलटून अपघात झाला. त्यामुळे रत्नागिरी पोलिस दलामार्फत सर्व नागरिकांना व पर्यटकांना समुद्रकिनारी वाहन चालवण्यास मनाईबाबत आवाहन करण्यात आले आहे. गुरुवार ११ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वा. सुमारास दापोली पोलिस ठाणे हद्दीमधील कर्दे येथील समुद्रकिनारी अज्ञात चालक आपल्या ताब्यातील महिंद्रा थार त्या समुद्रकिनारी धोकादायक पद्धतीने, अति वेगाने वळणे घेत वाहन चालवत होता.

त्यावेळी वाहनावरील ताबा सुटल्याने अपघात घडला व वाहन उलटून चालकासह तेथील असणाऱ्या पर्यटकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला. या प्रकरणी दापोल पोलिस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरुद्ध समुद्रकिनारी धोकादायक पद्धतीने वाहन चालवल्याबद्दल भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ११०,२८१,१२५ व मोटार वाहन कायदा कलम १८४,१३४,१७७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या संदर्भात रत्नागिरी जिल्हा पोलिस दलामार्फत सर्व नागरिक व पर्यटकांना आवाहन करण्यात येत आहे की, समुद्रकिनारी कोणत्याही प्रकारची वाहने चालवू नयेत.

समुद्रकिनारी वाहन चालवणे धोकादायक असून अपघातास कारणीभूत ठरू शकते, वेगाने किंवा निष्काळजीपणे वाहन चालविणाऱ्यांविरोधात रत्नागिरी पोलिस दलामार्फत कठोर कारवाई करण्यात येईल. समुद्रकिनारी येणारी लहान मुले, ज्येष्ठ नागरिक व पर्यटकांच्या सुरक्षिततेस बाधा पोहोचणार नाही, याची दक्षता घ्यावी. वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे व अशा प्रकारे कोणी समुद्रकिनारी नियमभंग करून धोकादायक वाहन चालवताना आढळून आल्यास आपल्या जवळच्या पोलिस ठाण्यात किंवा डायल ११२ वर कळवण्यात यावे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:15 AM 15/Sep/2025