Marleshwar : मार्लेश्वर पर्यटन विकासासाठी धरणे आंदोलन तूर्तास स्थगित

देवरुख : श्री क्षेत्र मार्लेश्वर देवस्थान पर्यटन विकासासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करणाऱ्या गाव विकास समितीने १५ सप्टेंबर रोजी देवरुख तहसील कार्यालयासमोर होणारे लक्षवेधी धरणे आंदोलन तूर्तास स्थगित केले आहे.

जिल्हा प्रशासनाचे मार्लेश्वर पर्यटन विकासाबाबत काय धोरण आहे याची माहिती घेतल्यानंतर आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाणार आहे. समितीचे शिष्टमंडळ लवकरच जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन या विषयावर निवेदन सादर करणार आहे. यासंदर्भात गाव विकास समितीच्या अनघा कांगणे व महेंद्र घुग यांनी तहसीलदारांना निवेदन दिले आहे. या निवेदनानुसार, मार्लेश्वर देवस्थानच्या पर्यटन विकासाचा आराखडा जाहीर करावा, अशी मागणी गाव विकास समिती प्रशासनाकडे अनेक दिवसांपासून करत आहे. या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी समितीने लक्षवेधी धरणे आंदोलनाची घोषणा केली होती.

मात्र आता या विषयावर समितीचे शिष्टमंडळ थेट जिल्हाधिकाऱ्यांची वेळ घेऊन भेट घेणार आहे. या भेटीत मार्लेश्वर पर्यटन विकासाबाबत निवेदन सादर केले जाईल. जिल्हा प्रशासनाचे पर्यटन विकासाबाबत काय धोरण आहे याबाबतची माहिती या गाव विकास समितीकडून घेतली जाणार आहे. यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीनंतर पुढील दिशा निश्चित केली जाईल, असे समितीने स्पष्ट केले आहे. यामुळे तात्पुरत्या स्वरूपात हे आंदोलन स्थगित केल्याचे जाहीर करण्यात आले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:05 AM 15/Sep/2025

Amey jwelrs