Ratnagiri : गणेशोत्सवात अन्न-औषध प्रशासनाची कारवाई

रत्नागिरी : गणेशोत्सवात जिल्ह्यातील ग्राहकांना चांगल्या दर्जाची मिठाई मिळावी, भेसळ होऊ नये, यासाठी रत्नागिरीमधील अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाची करडी नजर होती. या कालावधीत जिल्ह्यातील ९ आस्थापनांची झाडाझडती घेण्यात आली. त्यापैकी मिठाईसह दुग्धजन्य, तेलासह अशा एकूण ९ अन्नपदार्थांची संशयित नमुने घेण्यात आले आहेत. तसेच संशयित सामग्रीचा साठा जप्त करण्यात आला आहे. अहवाल अद्याप प्रलंबित आहे. ज्या उत्पादकांनी अन्नात भेसळ केली असेल त्यावर कारवाई होणार आहे.

गौरी-गणपतीच्या सणानिमित्त रत्नागिरी शहरातील मिठाईसह विविध अन्न पदार्थाची मोठ्या प्रमाणात मागणी असते. यावेळी भेसळची शक्यता होती. मिठाईसह खवा, मावा, तूप, तेल व दुग्धजन्य पदार्थात भेसळ होवू नये म्हणून विशेष तपासणी मोहीम हाती घेण्यात आली. जिल्ह्यातील मिठाई दुकानातील काजू कतली १, तेलाचे २, घी १, पनीर १, पॅकेट बंद पाण्याच्या बाटल्याचे १, बनवलेले पदार्थ २, फरसाण १ असे विविध दुकानातील ९ संशयित नमुने घेण्यात आले. तपासणी दरम्यान घेतलेले अन्ननमुने मुंबईत प्रयोगशाळेत चाचणीसाठी पाठवण्यात आले. त्याचा अद्याप अहवाल आलेला नाही. अहवाल आल्यानंतर दोषी उत्पादकांवर कारवाई करण्यात येणार आहे.

गणेशोत्सवात अन्न व औषध प्रशासनाच्या टीमने शहरासह ग्रामीण भागातील हॉटेल, मिठाई, दुग्धजन्य पदार्थासह विविध दुकानांची तपासणी केली. काहीसाठा जप्त करण्यात आला असून यामध्ये संशयित नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. त्याचा अहवाल आलेला नाही. अहवाल आल्यानंतर कारवाई होईल- नितीन मोहिते, सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, रत्नागिरी

गुहागर विषबाधाप्रकरणी अन्न प्रशासनाची चुप्पी
गुहागर येथे ११ ऑगस्ट रोजी बंगलोर अय्यंगार बेकरीमधील पेढ्यातून काहीजणांना विषबाधा झाली होती, याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाने सर्वसाठा ताब्यात घेतला होता. पुढील चौकशीसाठी उत्पादन पेढी देसाई फूड प्रोसेसिंग, पो. शिरवळ ता. पाटण, जि. सातारा येथील अन्न प्रशासनास कारवाई करण्याचे सूचित केले होते. मात्र महिना उलटून गेला याप्रकरणी काय कारवाई केली याविषयी रत्नागिरी अन्न प्रशासनाचे सहायुक्त उत्तर देत नाहीत, भ्रमणध्वनीवर संपर्क केला असता याविषयी माहिती देत नाहीत. एकप्रकारे याप्रकरणी अन्न प्रशासनाची चुप्पी असल्याचे दिसून येत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:51 AM 15/Sep/2025