सर्दी, तापाच्या रुग्णांत वाढ

पावस : वातावरणातील बदलांमुळे पावस परिसरामध्ये सर्दी, तापाच्या रुग्णांची संख्या वाढलेली आहे. अंगदुखी, डोकेदुखी, सतत झोप येणे, पायात गोळे येणे, पाय वळणे यासारखे त्रास ग्रामीण भागातील लोकांमध्ये दिसत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे रुग्णांची संख्या वाढत आहे.

पावस परिसरात दिवसाला शंभरहून अधिक लोक खासगी रुग्णालयात तपासणीसाठी जात असल्याचे पुढे आले आहे. दररोज रुग्णांची संख्या वाढत आहे. दोन-तीन वेळा तपासणी करूनही प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने आर्थिक भुर्दंडही बसत आहे. हजारो रुपये खर्च करूनही आराम न मिळाल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. या पार्श्वभूमीवर पावस प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत गावोगाव प्रतिबंधक उपाययोजना, जनजागृती, मोफत तपासणी, औषध वाटप केले जात आहे.

यासंदर्भात वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संतोष कांबळे म्हणाले, सध्या हवामानाचा परिणाम मोठ्याप्रमाणात आरोग्यावर होत आहे. ताप, खोकला यासारखे आजार पसरत आहेत. आरोग्य केंद्राद्वारे रुग्णांवर औषधोपचार सुरू आहेत. आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. साठा पुरेसा आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:34 PM 15/Sep/2025

Tata motars