Lanja : माचाळ प्राथमिक शाळेला वीज मीटरसाठी आर्थिक मदत

लांजा : लांजा येथील उद्योजिका व सामाजिक कार्यकर्त्या वैदेही धनंजय वळंजू यांनी तालुक्यातील माचाळ येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळेला वीज मीटर खरेदीसाठी ५ हजार रुपयांची आर्थिक मदत केली आहे. त्यामुळे शाळेची विजेची दीर्घकाळ चाललेली गैरसोय दूर होणार आहे.

माचाळ येथील जिल्हा परिषद शाळेत यापूर्वी वीज होती. मात्र, वीज बिल थकल्यामुळे महावितरणकडून वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून शाळेत वीज नव्हती. परिणामी विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. त्यानंतर शासनाकडून थकलेले वीज बिल भरले गेले. नवीन वीज मीटर उपलब्ध नसल्यामुळे वीज पुरवठा सुरू होऊ शकत नव्हता. ही गरज लक्षात घेऊन शाळेचे मुख्याध्यापक प्रफुल्ल पट्टेबहाद्दूरर यांनी लोकसहभागातून निधी मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. शाळेची परिस्थिती लक्षात घेऊन वैदेही वळंजू यांनी ५,००० रुपयांची मदत देऊन वीज मीटर बसवण्यासाठी मोलाचे योगदान दिले. त्यांच्या या मदतीमुळे शाळेतील विजेची गैरसोय लवकरच संपुष्टात येणार आहे. ही आर्थिक मदत प्रदान करताना माचाळ येथील गावकरी पांडुरंग पाटील, विजय पाटील, कृष्णा पाटील, पोलिसपाटील विष्णू पाटील, शिक्षक सचिन नागरगोजे, अंगणवाडी सेविका रिचा मांडवकर आदी उपस्थित होते.

समस्या सोडवण्यासाठी उठावाची गरज
माचाळ ही दुर्गम भागातील शाळा आहे. याठिकाणी लोकसहभागातून देणगी गोळा करणेही शक्य नाही. या परिसरात जाण्यासाठी गेल्या काही महिन्यांपूर्वी रस्ते झाले आहेत. अशा दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी उठावाची गरज आहे. त्याची सुररुवात वैदेही वळंजू यांनी केलेल्या मदतीने झाली आहे, असे येथील ग्रामस्थांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:11 PM 15/Sep/2025